हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून शुक्रवारी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद ४ वाजता मागे घेण्यात आला. हा बंद यशस्वी झाल्याचं प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला आमची ताकद आणि विरोधदाखवून देण्यासाठीच या बंदचं आयोजन केलं असल्याची स्पष्टोक्ती प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिली.
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबई, औरंगाबाद आणि सोलापूरमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. तर कोल्हापूर, सातारा, पुणे याठिकाणी बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. जालना, लातूर या भागात बंदला हिंसक वळण लागल्याचं चित्र पाहायला मिळालं.
मुंबईतील बंदबाबत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी रेल्वे, बेस्ट आणि व्यापाऱ्यांचा दाखला देत बंद यशस्वी झाल्याचं सांगितलं. १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने गांभीर्याने विचार करावा अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली. शांततेत बंद यशस्वी केल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आंबेडकरांनी आभार मानले.