पुणे । कोरोना संसर्गामुळे देशव्यापी संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे देशातील अनेक उद्योग व्यवसाय बंद होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भाडेतत्वावर राहणाऱ्या लोकांना सूट दिली होती. मात्र आता घरमालकांनी थकीत भाड्यासाठी मागणी सुरु केली आहे. यावरून मालक व भाडेकरू यांच्यामध्ये वाद होत आहेत. घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील हे वाद सामंजस्याने सोडविण्याची गरज असल्याचे असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट्स या संघटेनद्वारे सांगण्यात आले आहे. तसे निवेदन त्यांनी दिले आहे. त्यांनी या निवेदनात घरमालकानावर गुन्हे दाखल करण्यापूर्वी त्यांच्या समस्या समजून घ्या अशी विनंती केली आहे.
नोकरी, व्यसायाबरोबरच उत्पन्नाचा दुसरा स्रोत म्हणून बरेच जण घर भाड्याने देतात. पुण्यात शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने अनेकजण वास्तव्यास येत असतात. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक या घरभाड्यामधून आपला खर्च भागवितात. महानगरपालिकेचा कर, वीज बिल, घर दुरुस्ती हे सर्व खर्च ते भाड्यातून करत असतात. महापालिकेने करभरणा करण्यासाठी माफ केला नाही. म्हणूनच घरमालकांनी भाडेकरुंकडे थकीत भाड्याची मागणी सुरु केली असल्याचे या निवेदनात सांगण्यात आले आहे. तसेच गृहनिर्माण विभागाने या काळात तीन महिन्याचे टप्प्याटप्प्याने भाडे देण्यास सांगितले याचा अर्थ भाडे देऊच नये असा नाही. त्यामुळे घरमालकावर गुन्हा दाखल करणे योग्य ठरत नाही असे या निवेदनात म्हंटले असल्याची माहिती या असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी दिली.
जर पोलिसांनी घरमालकांविरोधात गुन्हा दाखल केला तर लोक याचा गैरफायदा घेतील काहीजण भाडे देणारच नाहीत. गुन्हा दाखल केल्यामुळे घरमालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे असे त्यांनी सांगितले. शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक जे सेवानिवृत्त झाले आहेत ते या भाड्याचा वापर सेवानिवृत्ती वेतन म्हणून करतात. तर अनेकांनी कर्ज काढून घरे घेतली आहेत. मिळणाऱ्या भाड्यातून ते कर्जाचा हप्ता भरतात या बाजूचाही विचार करावा अशी विनंती त्यांनी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.