हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणुका कधीही घ्या, हुकूमशाहीरूपी हिरण्यकश्यपूचा अंत हा ठरलेला आहे. भाजपने चांद्रयान 3′ आणून त्यावर स्वार होऊन प्रचार केला तरी त्यांच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ आहे. त्यांच्या कुंडलीतल्या ओढूनताणून आलेल्या सत्तायोगाची हवा गेली आहे. त्यांना राजयोग नव्हताच ओढून चोरून आणलेला सत्तायोग होता. तो आता संपल्यात जमा आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातुन भाजपवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हंटल सामना अग्रलेखात –
लोकसभा निवडणुका वेळेच्या आधीच, म्हणजे डिसेंबर महिन्यातच घेतल्या जातील, असा दावा प. बंगालच्या मुख्यमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी यांनी केला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी नोव्हेंबर -डिसेंबर महिन्यांत देशभरातील सर्व हेलिकॉप्टर्स बुक करण्यास सुरुवात झाली आहे. खासगी, छोटी विमाने, हेलिकॉप्टर्स यांचे बुकिंग करून आपल्या राजकीय विरोधकांना कोंडीत पकडायचे. निवडणूक प्रचारासाठी कोणतीच वेगवान साधने विरोधकांना मिळू नयेत यासाठी सुरू असलेला सत्तेचा हा गैरप्रकार निषेधार्ह आहे. भाजपकडे व त्यांच्या पाठीराख्यांकडे अमर्याद साधनसंपत्ती आहे. ही संपत्ती कशा पद्धतीने येते याचे एक साधे उदाहरण आम्ही देतो. ‘चांद्रयान 3’ मोहिमेचा एकूण खर्च किती झाला? तर 650 कोटी रुपये आणि दिल्लीतील द्वारका एक्सप्रेस वेच्या 3 किलोमीटर रस्त्याचा खर्च 750 कोटींवर गेल्याचे उघड झाले. जे काम फार तर 75 कोटींत व्हायला हवे ते 750 कोटींवर गेले. मग मधल्या पाचशे कोटींचा हिशेब कोठे गेला? ते भाजपच्या तिजोरीत गेले की भाजप पुरस्कृत ठेकेदाराच्या खिशात? हा झाला फक्त 3 किलोमीटरचा हिशेब. त्या 3 किलोमीटरमागे 500 कोटींची फावडेबाजी करणाऱ्यांनी निवडणूक प्रचारासाठी देशातील सर्व खासगी विमाने, हेलिकॉप्टर्स बुक करून ठेवली तर त्यात नवल नाही.
अर्थात तुम्ही कितीही काहीही बुक केले तरी यावेळी मतदार भ्रष्ट ईव्हीएमच्या छाताडावर पाय ठेवून हुकूमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत. भगवान विष्णूने आपला भक्त प्रल्हादास दैत्य हिरण्यकश्यपूपासून वाचवण्यासाठी नरसिंह अवतार घेतला. दैत्य हिरण्यकश्यपूचा अंत नरसिंहाने ज्या भयंकर पद्धतीने केला तीच गत जगभरातील सर्वच हुकूमशहांची झाली. एक तर हुकूमशहांना देश सोडून पळून जावे लागले किंवा खवळलेल्या जनतेने त्यांच्या प्रासादात घुसून त्यांचा खात्मा केला. कारण लोकशाहीत जनता हीच नरसिंहाचा अवतार आहे. त्यामुळे 2024 असो की 2023, निवडणुका कधीही घ्या, हुकूमशाहीरूपी हिरण्यकश्यपूचा अंत हा ठरलेला आहे. ‘इंडिया’ आघाडीने देशाचे वातावरण ढवळून काढले आहे. जनता जागी झाली आहे व कोणत्याही भूलथापांना ती बळी पडणार नाही. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणतात त्याप्रमाणे भाजपने देशातील सर्व विमाने, हेलिकॉप्टर्स प्रचारासाठी बुक केली आहेत. आम्ही म्हणतो, त्यांना हवे ते करू द्या. त्यांनी ‘चांद्रयान 3’ आणून त्यावर स्वार होऊन प्रचार केला तरी त्यांच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ आहे असं म्हणत सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.