हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेश मधील कानपुर येथे (शनिवारी) आज दुपारी बहुजन समाज पार्टीचे माजी नेते नरेंद्र सिंह उर्फ पिंटू सेंगर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कानपूरमधील चकेरी याठिकाणी हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला, यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यत आले. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. दिवसाढवळ्या असा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. ज्यांनी ही घटना पाहिली आहे त्यांनी सांगितले, नरेंद्र सिंह उर्फ पिंटू सेंगर हे यावेळी जाजमऊ परिसरात केडीए आशियाना कॉलनीजवळ आपल्या इनोव्हा कारमधून उतरून फोनवर बोलत होते.
नरेंद्र सिंह उर्फ पिंटू सेंगर तिथे असतानाच दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत पिंटू सेंगर घटनास्थळीच कोसळले. हल्लेखोरांनी रस्ता मोकळा असल्याचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा केला असता त्यांना काही काडतूसं आढळून आली. पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे असे पोलिसांनी सांगितले.
मूळचे गोगूमऊ येथील निवासी असलेले नरेंद्र सिंह उर्फ पिंटू ठाकूर चकेरी येथील मंगला बिहारमध्ये राहत होते. विद्यार्थी दशेतील राजकारणानंतर ते राजकारणात सक्रीय झाले होते. बसपामधून त्यांनी छावणी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्या आई शांतीदेवी गजनेरच्या कठेठी येथू जिल्हा पंचायत सदस्या आहेत तर वडील सोने सिंह हे गोगूमऊचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्री व बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांना चंद्रावर जमिनीचा तुकडा देण्याचे म्हटले होते त्यावेळी ते चर्चेत आले होते. सध्या त्यांना पक्षातून काढण्यात आले होते अशी माहिती समोर आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.