Sunday, May 28, 2023

आमच्या कुटुंबाची बदनामी थांबवा अन्यथा मलाही आत्महत्या करावी लागेल; पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यातील वानवडी भागात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या मूळची परळी, जि.बीड येथील २३ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर दिवसेंदिवस नवीन – नवीन माहिती समोर येतेय.

यावर पूजाची बहिण दिया चव्हाण हिने संताप व्यक्त केलाय. पूजा आणि आमच्या परिवाराची बदनामी थांबवा अशी तिने हात जोडून माध्यमांना विनंती केली आहे. तसेच या बदनामीला कंटाळून कोणी आमच्या कुटुंबातून जायची वाट पाहात असाल तर सांगा, आम्ही ते ही करूत असे भावनिक आवाहन दियाने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून केले आहे.

पोस्टमध्ये ती म्हणतेय की, ”वृत्तमाध्यमे सत्य लोकांसमोर यावे यासाठीच असतात ना? पंकजा मुंडे, प्रितम मुंडे त्यांच्यासोबतच्याही पूजाच्या पोस्ट आहेत. त्या का नाही कोणी व्हायरल करत? जर त्या पुरूष असत्या तर त्यांच्यासोबतही नाव जोडले असते. माध्यमे ही काहीही मनघडन, त्यांच्या आवडीनूसार, काहीपण कॅप्शन देऊन वाटेल ते पूजाच्या नावाने खोटी माहिती प्रसारित करण्यासाठीत आहेत. प्रसार माध्यमातून सध्या काही फोटो व्हायरल होत आहेत. म्हणे पूजाला कोणाकडून गिफ्ट मिळाले आहेत. आणि ते कथित व्यक्तिकडूनच भेटले असा दावाही वृत्तवाहिन्या करत आहेत.

हे असे दररोज काहीतरी नवीन ऐकूण माध्यमांवरून विश्वास उडाला आहे. कोणाचे दु:ख कमी करू शकत नसाल तर कृपया हात जोडून विनंती आहे की त्यात भर तरी टाकू नका. हा त्रास आता दिवसेंदिवस असहनीय होत आहे. पूजा सुद्धा कोणाची तरी लेक किंवा कोणाची तरी बहिण आहे. अशा प्रकारची बदनामी करत आहात तुम्ही. आम्ही सहन तरी कशी करणार? माझ्या आई-वडिलांना काही व्हावे असे तुमची इच्छा आहे का? अनेकदा सर्वांना विनंतरी करूनही आमची बदनामी करणे थांबवत नाहीयेत. या बदनामीला कंटाळून कोणी आमच्या कुटुंबातून जायची वाट पाहात असाल तर सांगा, आम्ही ते ही करूत…” असे भावनिक आवाहन तिने केले आहे.

दरम्यान, मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी संजय राठोड यांच्यावर टीका करतानाच मीडियाला देखील एक विनंती केली आहे. पूजाचे पर्सनल फोटो प्रसारित केल्याने, आमच्या लेकींवर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे मीडियाने पूजाचे पर्सनल फोटो दाखवणे बंद करावे, अशी विनंती रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.