पंढरपूर | पंढरपूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. आज पंढरपुरात भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पंढरपूरात सभा झाली. यावेळी फडणवीस यांनी महा विकास आघाडी सरकारवर तुफान फटकेबाजी केली. आताचे हे सरकार लोकहिताच्या विरोधातले सरकार आहे. सत्तेवर आले तेव्हा हे महाविकास आघाडी सरकार होतं पण आता हे महावसुली सरकार आहे अशी टीका त्यांनी केली.
या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील महा विकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणासंदर्भात आयोग स्थापन करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु महाविकास आघाडी सरकारने आयोग नेमला नाही. त्यामुळे या नालायक महा विकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ग्रामपंचायत पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकेत ओबीसी, व्हजेटी या समाजाच्या आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे भविष्यात या समाजाचे नोकरी आणि शिक्षणात आरक्षण धोक्यात येईल अशी भीती आहे’. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
35 गावांचा शेतीचा पाणी प्रश्न सोडवू
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांचा शेतीचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी केंद्रातून मदत आणून या भागातील पाणी प्रश्न सोडवू असे आश्वासन ही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आपल्या राज्यात आहेत. एकट्या महाराष्ट्रात 55% रुग्णांचा मृत्यू होत आहे. लॉक डाऊन करताना ज्यांचे पोट बंद होतो त्यांना मदत करणं गरजेच आहे. छत्तीसगड राज्याने तेथील शेतकऱ्यांना मदत केल्याचं उदाहरण त्यांनी यावेळी दिले. अशा अनेक विषयांवर भाष्य करत पंढरपुरातील सभेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकार विरोधात चौफेर फटकेबाजी केली.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा