परभणी जिल्ह्यात युतीचा झेंडा फडकला !

परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांचे निकाल आता हाती आले असून, जिल्ह्यातील मतदाराने तीन विद्यमान आमदारांना नाकारले आहे. तर परभणी विधानसभेच्या विद्यमान आमदारांना, पुन्हा संधी दिलीय. या निकालामुळे, जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आता, तीन चेहऱ्यांना बदलून संधी मिळाली आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघांमधून तुरूंगामधून निवडणूक लढवत उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी विजय मिळवत जिल्ह्यातील राजकारणामध्ये इतिहास नोंदवला आहे. यासोबतच परभणी मध्ये आमदार राहुल पाटील यांनी विरोधकांचे डिपॉझिट जप्त करत भव्य विजय खेचून आणला आहे.

ऊसतोडणी कामगाराचा मुलगा झाला आमदार

जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे राम सातपुते विजयी झाले. सातपुते यांनी राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा ६ हजार मतांनी पराभव केला. मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व असलेल्या माळशिरसमधून ऐनवेळी उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्या आहार. भाजपाने येथून राम सातपुते यांना उमेदवारी दिली होती.

भारत भालकेंनी सुधाकर परिचारकांना दिला धोबीपछाड!!

पंढरपूर-मंगळवेढ्याचे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. आमदार भारत भालके यांनी सलग तिसऱ्यांदा विधानसभा जिंकली आहे. आधी अपक्ष, मग काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवून भालके यांनी आपला गड राखला आहे.

‘मनसे’ने भोपळा फोडला!! कल्याण मधून राजू पाटील विजयी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपलं खातं उघडलं आहे. मनसेचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू रतन पाटील यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांना ८६,२२३ मते मिळाली. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे रमेश म्हात्रे निवडणूक रिंगणात होते. म्हात्रे यांनी राजू पाटील यांना कडवी झूंज दिली. रमेश म्हात्रे यांना ८०,६६५ मते मिळाली आहेत.

कागलमध्ये हसन मुश्रिफांच निर्विवाद वर्चस्व कायम !!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कागल मतदार संघाचा निकाल जनतेसमोर आला आहे. राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ हे सलग पाचव्यांदा विजयी झालेले आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून संजय घाडगे आणि ‘भाजपा’चे बंडखोर उमेदवार समरजितसिंह घाडगे उभे होते. या दोघांचा देखील मुश्रीफांनी दारुण पराभव केला आहे.

महायुतीचंच सरकार येणार – देवेंद्र फडणवीस

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेचे निकाल हाती आले असून महायुतीला १६० जागांवर विजय मिळवणं शक्य झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नाला लोकसभेच्या जागावाटपाचा दाखला देऊन ‘फिफ्टी-फिफ्टी’ परिस्थिती राहणार असल्याचं तसेच आता समजून घ्यायची वेळ भाजपची असं सांगितल्यानंतर तोच कित्ता देवेंद्र फडणवीसांनी पुढे नेला आहे. दोन्ही पक्षांच्या मिळून काही अपेक्षा आहेत. आम्ही एकत्र बसून त्यावर निर्णय घेऊ असं सांगत मुख्यमंत्रीपदाबाबत ‘आमचं ठरलंय’ अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे

दत्तात्रय भरणेंनी हर्षवर्धन पाटलांना पुन्हा केले ‘चितपट’

इंदापूरमधून भाजपने हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, राष्ट्रवादीने इंदापूरचा गड राखला असून येथून दत्तात्रय भरणे यांचा विजय झालाय. शरद पवारांनी इंदापूर मतदारसंघात सभा घेऊन हर्षवर्धन पाटील यांच्याशी मी संपर्क साधल्याचं सांगतिलं होतं. तसच, दत्तात्रय भरणेंना विजयी करण्याचं आवाहनही इंदापूरकरांना केलं होतं. पवारांच्या झंझावती दौऱ्याचा आणि इंदापूरमधील सभेचाही भरणेंना फायदा झाला. तसेच, हर्षवर्धन यांचं भाजपात जाणं इंदापूरकरांना रुचलं नसल्याचं दिसून येतंय.

नालासोपाऱ्यात शिवसेनेचा ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ उमेदवार पराभूत

नालासोपारा विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे प्रदीप शर्मा विरुद्ध बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांच्यावर सर्वांचं लक्ष लागलं होतं. निवडणूक निकालात बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. तर ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ म्हणून पोलीस दलात ख्याती असलेले शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मा पिछाडीवर चालत होते.

आता नमतं घ्यायची वेळ भाजपची; मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य

लोकसभा निवडणुकीच्या वेळी युतीचा फॉर्म्युला निम्मा निम्मा असाच ठरला होता. जागा वाटप करताना आम्ही कमी जागा घेतल्या. आता मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड केली जाणार नाही. अमित शहा आता बोलणी करायला येतील त्यावेळी पारदर्शकतेने काय निर्णय घ्यायचा तो विचार करू असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी या निकालाने आमचे डोळे उघडले असल्याचं सांगितलं आहे.

मुंबई-ठाण्यात शिवसेनेची ‘मुसंडी’ तर पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे ‘वर्चस्व’

महाराष्ट्र निर्मिती नंतरच्या तेराव्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज हाती येत आहे. मतदानोत्तर एक्झीट पोलमध्ये भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकेल असा दावा करण्यात येत होता. तर शिवसेना शंभरी पार करेल असा अंदाज होता. भाजपचे स्वबळाचे स्प्न पुर्ण होण्याची चिन्हे विरली आहेत मात्र, सेना शंभरीच्या आसपास पोहचली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची गळती, पक्षातील दिग्गज नेत्यांचे सत्ताधारी पक्षात पलायन यामुळे राष्ट्रवादीची ताकद क्षीण झाल्याचे बोलले जात होते. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेवटच्या क्षणापर्यंत झूंज दिली. संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. जिथले – जिथले नेते सोडून गेलेत तेथे झंझावती सभा घेतल्या. तसंच संपुर्ण राज्यात साता-याची निवडणूक दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. तेथे राष्ट्रवादीनं आपला गड राखला.