सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नाने सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात गर्भवती महिलेने पिढ्यान पिढ्या असणाऱ्या ग्रहणाच्या काळातील विविध अंधश्रद्धा झुगारल्या. इस्लामपुरातील महात्मा फुले कॉलनी मधील गर्भवती महिला सौ. समृद्धी चंदन जाधव यांनी ग्रहणाच्या काळात भाजी चिरणे ,फळे कापणे, झाडांची फळे पाने तोडणे, अन्न खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालणे यासह विविध शारीरिक हालचाली करत ग्रहण कालावधी आनंदात व्यतीत केला. प्रत्यक्ष सौर चष्म्यातून सूर्यग्रहण पाहून धाडसी कृती करत या तरुणीने वेगळा आदर्श घालून दिला.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून इस्लामपूर येथील समृद्धी जाधव या गर्भवती महिलेने हे धाडस केलं या कुटुंबियांचे बनसोडे यांनी प्रबोधन केल्याने सर्वच कुटुंबीयांनी खगोल शास्त्रीय आनंद लुटण्याचे धाडस करीत पिढ्यानपिढ्याच्या अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचा प्रयत्न केला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. इस्लामपुर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष सीमा पोरवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. सौ. समृद्धी जाधव म्हणाल्या, आज आधुनिक काळात इंटरनेटच्या युगामध्ये अशा अंधश्रद्धा बाळगणे चुकीचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने माझे व माझ्या कुटुंबाची जागृती केली. आम्ही हे धाडसी पाऊल टाकले आहे. माझ्या कुटुंबीयांनी मला साथ दिली. सासूबाई श्रीमती सिंधुताई जाधव,पती चंदन जाधव, दीपक जाधव आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय बनसोडे यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे या उपक्रमात सहभागी झाल्याने मला खूप आनंद वाटला.
विज्ञानाच्या काळात हे धाडसी पाऊल उचलायला नको का ? असा सवाल ही यावेळी त्यांनी केला. पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या अंधश्रद्धेच्या परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न इस्लामपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केल्याने ग्रहणा बाबतचा गैरसमज दुर झाल्याची भावना अनेक नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.