औरंगाबाद प्रतिनिधी | कंपनीतील काम आटोपल्यानंतर घरी जाणाऱ्या तरुणाची दुचाकी नियंत्रण सुटल्याने खोल विहिरीत पडली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याला वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले. ही घटना कुंबेफळ शिवारात मध्यरात्री 12 च्या सुमारास घडली शुभम बबन यादव असे 22 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे तर गणेश दादाराव पवार असे 21 वर्षीय जखमी तरुणाचे नाव आहे.
या दुर्दैवी घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मृत शुभम आणि त्याचा मित्र गणेश हे दोघेही एकाच गावातील व एकाच कंपनीत कामाला होते. रात्री कंपनीची शिफ्ट संपल्यावर दोघेही एकाच दुचाकीवरून घरी चित्तेपिंपळ गाव येथे येत असताना मौजे कुंभेफळ शिवारातील वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यावरून शेतात गेली. सुमारे 20 फूट अंतरावर असलेल्या 50 फुटी खोल विहिरीत दुचाकीसह दोघे पडले. या मध्ये शुभंमचा जागीच मृत्यू झाला तर गणेश बेशुद्ध झाला होता.
दरम्यान, बराचवेळ झाल्यानंतर एका शेतकऱ्यांनी दोघांना विहिरीत पाहिले व याबाबत पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत वीहिरीत उतरत गणेश चे प्राण वाचविले. मात्र शुभमला वाचविण्यात यश मिळाले नाही दुचाकी आणि शुभमचा मृतदेह बाहेर काढण्यात आला या प्रकरणी कारमाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.




