कोल्हापूर प्रतिनिधी। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत माजी मंत्री प्रकाश आवडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन नव्या राजकीय घरोब्याची तयारी सुरू केली आहे. उभय नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास बंद खोलीत खलबते झाली. मात्र, चर्चेविषयी माहिती देण्यात आली नाही. इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले या तीन मतदारसंघात आवाडे गटाची लक्षणीय ताकद आहे.
त्या जोरावर वंचित बहुजन आघाडीशी युती करून प्रकाश आवाडे आपले उमेदवार उभे करतील या चर्चेलाआंबेडकरांच्या भेटीनंतर जोर चढला आहे. इचलकरंजीतून स्वतः प्रकाश आवाडे तर हातकणंगले मधून जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती किरण कांबळे इच्छूक असल्याचे सांगण्यात येते. याच संदर्भात आवाडे यांनी आंबेडकरांची भेट घेतली असल्याची शक्यता वर्तवली जाते.
आंबेडकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘पूर्ण राज्यात कोणत्याही अपक्ष उमेदवारांला आम्ही पाठिंबा देणार नाही. मात्र एखाद्या नोंदणीकृत पक्षाने आमचा मित्र पक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली तर नक्कीच त्यांना आम्ही सोबत घेऊ’ असे त्यांनी स्पष्ट केले. तर आवडे यांना विचारले असता, ‘आंबेडकर राज्यातील मोठे नेते आहेत. ते शहरात आल्याचे समजताच त्यांची भेट घेतली. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे’ त्यांनी स्पष्ट केले.