मुंबई | ऑनलाइन साइटवर मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असते. त्यामध्ये फेसबुक, बँकिंग आणि इतर माध्यमांमधून फसवणूक केली जाते. आता यामध्ये लग्न जुळवणाऱ्या ऑनलाइन साईट मधूनही फसवणुकीचे गुन्हे समोर आले आहे. अशीच घटना कल्याणमध्ये घडली असून तरुणीला 16 लाख 45 हजारांचा ऑनलाइन गंडा बसला आहे.
नवी मुंबई येथे एका खाजगी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या 33 वर्षीय तरुणीला या फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे. ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या लग्न जुळवणाऱ्या ऑनलाइन साईटवरती लग्नासाठी रजिस्ट्रेशन केले होते. युके मध्ये राहणाऱ्या प्रकाश शर्मा नावाच्या व्यक्तीने तिच्याशी संपर्क केला. आणि लग्नासाठी तयार असल्याचे सांगितले. यानंतर दोघांमध्ये ऑनलाईन चॅटिंग सुरू झाली. त्याने तिला भारतात येणार असल्याचे सांगितले.
23 जानेवारीला शर्मा यांनी सांगितले की तो दिल्लीला पोहोचला असून, त्याच्याकडे सोने असल्यामुळे कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला पकडले आहे. यातून सुटण्यासाठी पैसे भरावे लागतील. सुरुवातीला 65 हजार ची मागणी केली. ते पैसे तिने पाठवले. यानंतर 24, 25 आणि 26 जानेवारीला काही ना काही कारणे सांगून त्याने त्याच्याकडून 16 लाख 45 हजार रुपये घेतले. त्यानंतर तो गायब झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने कल्याणमधील खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये आरोपी शर्मा यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”