औरंगाबाद प्रतिनिधी | किरकोळ वादानंतर तीन आरोपीनी 27 वर्षीय तरुणाला भोसकून हत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास औरंगपुरा भागातील पिया मार्केट जवळ घडली. सीसीटीव्ही च्या मदतीने रात्री उशिरा सिटीचौक पोलिसांनी तीन संशयित आरोपिना अटक केली. समीर खान सिकंदर खान असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास समीर हा औरंगपुरा भाजी मंडई जवळील पिया मार्केट जवळ असलेल्या एका बिअरशॉपी जवळ मित्रांसह उभा होता. त्यावेळी तीनही आरोपी तेथे मदधुंद अवस्थेत आले. दरम्यान समीर व तिन्ही आरोपी मध्ये वाद झाला. तिन्ही आरोपी समीर जवळील पैशे हिसकावत होते. त्यावरून हा वाद झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मृताने तिघांना विरोध केल्याने संतापलेल्या आरोपींनी जवळील धारदार चाकूने मांडीत भोसकले, वार खोलपर्यंत असल्याने मोठा रक्तस्राव सुरू झाला. दरम्यान समीर खाली कोसळल्याचे पाहून तिघेही आरोपीनी तेथून पळ काढला. जखमी अवस्थेत मित्राने समीरला घाटी रुग्णालयात हलविले. मात्र तेथे वैधकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनस्थळी दाखल झाले त्यांनी मृत समीर सोबत असलेल्या तरुणाची मदत घेत परिसरातील बिअर बार, दुकानं,व परिसरातील घरावर लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता एका कॅमेरा मध्ये तिन्ही आरोपी कैद झाले होते. त्यांना समीर च्या मित्राने ओळखले असे सूत्रांनी सांगितले, रात्री उशिरा पोलिसांनी आरोपींची ओळख पटवित तीन जनांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
रात्री समीर ची तिघांनी हत्या केल्याची माहिती शहरभर वाऱ्यासारखी पसरली होती. त्याचे मित्र व नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती, आज सकाळी समिरवर घाटीतील शवविच्छेदन गृहात शवविच्छेदन करण्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त घाटी रुग्णालय परिसरात वाढविण्यात आला होता.
मृत समीर याचा गांजा विकण्याचा पारंपरिक धंदा आहे.या पूर्वी त्यावर पोलिसात गुन्हे दाखल आहेत तर सिटीचौक पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनि दिली. पिया मार्केट मध्ये दोन बिअर शॉपी आहेत. तर समोरच साई लीला नावाचा रेस्टॉरंट बार आहे. जेंव्हा हत्येची घटना घडली दरम्यानच्या काळात रेस्टॉरंट मध्ये देखील हॉटेल चालक आणि ग्राहकांमध्ये हाणामारी झाली होती. दोन्ही घटना एकच वेळी घडल्याने पोलीस देखील काहीकाळ संभ्रमात होते. मात्र जेंव्हा पोलिसांनी हॉटेल मध्ये जाऊन चौकशी केली तेंव्हा या दोन्ही घटनेचा परस्परांशी संबंध नसल्याचे उघड झाले व पोलीसना आरोपीचा माग काढण्यासाठी दिशा मिळाली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.