मुंबई प्रतिनिधी । अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील सर्व राजकीय चर्चा त्यांच्याभोवती केंद्रित झाली आहे. आपल्या सडेतोड वक्तव्यासाठी आणि आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अजित पवारांचं राजीनाम्याबाबत नेमकं म्हणणं काय आहे, हे अद्यापही समजू न शकल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबतच पवार कुटुंबीयही चिंतीत आहेत. आपल्यामुळे शरद पवारांना होत असलेला त्रास पाहवत नसून, सध्याच्या राजकारणात मन रमत नसल्यामुळे आपण व्यथित असल्याची कबुली अजित पवार यांनी आपल्याकडे दिल्याचं शरद पवार यांनी शुक्रवारी रात्री पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिल होतं. शुक्रवारी रात्री कर्जतमधील अंबालिका कारखान्यावर अजित पवार यांनी मुक्काम केला होता. शनिवारी दुपारी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर अजित पवार आणि शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, पार्थ पवार चर्चेसाठी उपस्थित आहेत. धनंजय मुंडे यांनी वेळ आल्यानंतर माध्यमांना सर्व काही गोष्टी समजतील अशी प्रतिक्रिया दिली.
अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर बारामती विधानसभेची जागा राष्ट्रवादी कोण लढविणार हा प्रश्न उभा राहिला आहे. अजित पवार यांनी राजकीय संन्यास घेतला तर ते २०१९ च्या निवडणुकीत प्रचार करणार का? पार्थ पवारांना बारामतीमधून तिकीट दिलं जाणार का? ५० वर्ष अभेद्य राहिलेला बारामतीचा गड वाचवण्यासाठी अधिक सक्षम उमेदवार म्हणून रोहित पवार कर्जत-जामखेड ऐवजी बारामतीमधून उभे ठाकणार का ?? हे सर्व प्रश्न उभे राहिले आहेत.
पवार कुटुंबियांवर अशा प्रकारे ज्या ज्या वेळी संकट आलं आहे त्या त्या वेळी त्या कुटुंबीयांनी आपसांत चर्चा करून प्रश्न सोडवला असून यावेळीही अशाच पद्धतीने प्रश्न सोडवला जाईल असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. अजित पवार हे भावनाप्रधान नेते असून मागील ५ वर्षांपासून त्यांना चौकशीच्या निमित्ताने नाहक त्रास दिला गेल्यामुळे ते त्रस्त आहेत. एकूणच मागील २० तासांत महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा पवार कुटुंबियांभोवती केंद्रित झालं असून त्यांच्या भूमिका काय असणार हे ‘सिल्व्हर ओक’ वरील चर्चेनंतरच समोर येणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे बारामतीमधील कार्यकर्ते मात्र अजित पवार पुन्हा उभारी घेतील असं सांगत अजित दादा जे करतील ते कार्यकर्त्यांच्या, कुटुंबाच्या आणि पक्षाच्या हिताचं असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.