हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांना मुदतवाढ मिळवून देण्यासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील असून ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने 25 कोटींचे डील केले आहे. भाजपाचे मोठे नेते गृहमंत्रालयात लॉबिंग करत आहेत की एक्स्टेन्शन दिले जावे, असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर त्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रात लॉबिंग करुन पोस्टिंग करायला किंवा मिळवायला ही काय महाभकास आघाडी आहे काय? असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.
अतुल भातखळकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, केंद्रामध्ये पंतप्रधान मोदीजींचे सरकार आहे. केंद्रात लॉबिंग करुन पोस्टिंग करायला किंवा मिळवायला ही काय महाभकास आघाडी आहे काय? याऊलट आर्यन खान प्रकरणात एसआयटी तपासाचं काय झालं? या एसआयटीने आपली चौकशी का थांबवली? याची माहिती आधी द्या. फर्जीवाडा, फर्जीवाडा नाही तर हा भ्रष्टाचारवाडा आहे.
नेमका काय केला आहे मलिकांनी आरोप ?
आज सकाळी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी अनेक मुद्यांवरून भाजप नेते आणि एनसीबीवर गंभीर आरोप केले. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध एनसीबीच्या वरीष्ठ अधिकार्यांनी फर्जीवाडा करणारा व चुकीच्या पद्धतीने लोकांना अडकवणारा अधिकारी असल्याचा अहवाल दिला आहे. असे असतानाही भाजपाचा राज्यातील एक मोठा नेता त्याला पुन्हा मुदतवाढ मिळवून देण्यासाठी केंद्रीय गृहविभागाकडे प्रयत्नशील आहे, असा गौप्यस्फोट मलिकांनी केला. तसेच वानखेडे यांना मुदतवाढ द्या. त्यामुळे खंडणी वसूल करण्याच्या खेळात कोण कोण सहभागी आहेत हे उघड करण्याची संधी मिळेल, असेही मलिक यावेळी म्हणाले.