मुंबई | कारोनाच्या काळामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले, शिक्षण पूर्ण झालेल्या नवीन पिढीला नोकरीची गरज भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये तरुणांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून नोकरीचे आमिष दाखवून लुटले जात आहे. तरुणांच्या या हतबल परिस्थितीचे सायबर क्रिमीनल मोठ्या प्रमाणात फायदा घेत आहेत. मोठ्या-मोठ्या कंपन्यांचे खोटे ऑफर लेटर बनवून तरुणांना फसवले जात आहे. आपणही नोकरीसाठी अशाप्रकारे अर्ज करत असाल तर थोडे सावधगिरी बाळगा.
चेंबूर भागात राहणाऱ्या आयुब सय्यद याने एका माध्यमांशी बोलताना सांगितले की, तो आठ महिन्यापासून बेरोजगार होता. कोका-कोला या कंपनीकडून त्याला एक ईमेल आला. ज्यामध्ये नोकरीची गोष्ट नमूद करण्यात आली होती. ज्या लोकांना नोकरी दिली जात आहे, त्यांची नावे देखील ईमेलमध्ये दाखवण्यात आली होती. नोकरी करण्यापूर्वी दिल्लीमध्ये प्रशिक्षण, राहण्याची व विमान प्रवासाची विनामूल्य सोयही करण्यात आल्याचे सांगितलं गेलं होतं. पण त्यापूर्वी सिक्युरिटी डिपॉजिट म्हणून आठ हजार रुपये त्याला भरायला सांगितले होते. त्याने पटकन ते आठ हजार रुपये सांगितलेल्या अकाउंटमध्ये भरले. आणि त्यानंतर त्याला दोन ते तीन दिवसानंतर विमान तिकीट आणि हॉटेल बुकिंग मिळेल असे सांगितले होते. परंतु, त्याला त्यानंतर कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्याने केलेल्या फोनला उत्तरही मिळाले नाही. यानंतर त्याने चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मुंबई सायबर सेलच्या उपायुक्त डॉक्टर रश्मी करंदीकर यांनी सांगितले की, ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर ज्या खात्यावर सय्यदने पैसे पाठवले होते ते खाते फ्रीज केले आहे. खाते फ्रीज केल्यामुळे त्याचे पैसे वाचवू शकले आहेत. यासोबतच करंदीकर यांनी तरुणांना सल्लाही दिला आहे. त्या म्हणतात की, असे काही ऑफर-लेटर तरुणांना आले तर त्यांनी कंपनीच्या मूळ संकेतस्थळावर जाऊन माहिती घ्यावी. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या कंपन्या कधीही सिक्युरिटी डिपॉजिटच्या रुपात पैसे घेत नाहीत. जर कोणी पैसे मागितले तर त्या ऑफरची पुन्हा एकदा पडताळणी करा. सोबतच, त्यांनी असेही सांगितले की, सध्या अशा तक्रारी खूप वाढत आहेत, ज्यामध्ये नोकरी शोधणारे तरुणांना सायबर क्रिमीनल फसवत आहेत. यामुळे अशा ऑफर आल्यानंतर त्याची पडताळणी करूनच मग पुढील पाऊल उचलले जावे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.