हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 25 जून 1983 … भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अजरामर होणारी ही तारीख. हा असा दिवस आहे ज्यानंतर भारतीय क्रिकेट पूर्णपणे बदलले. याच दिवसानंतर क्रिकेट हा भारतात एक धर्म झाला. आजपासून बरोबर 37 वर्षांपूर्वी भारताने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला. या सामन्यांत कपिल देवच्या नेतृत्वात वेस्ट इंडीजसारख्या बलाढ्य संघाला भारतीय संघाने 43 धावांनी पराभूत केले. त्यावेळी प्रथम फलंदाजी करताना भारताने केवळ 183 धावा केल्या होत्या, पण वेस्ट इंडीजचा मजबूत संघ या धावांच्या प्रत्युत्तरात केवळ 140 धावांवर बाद झाला.
नाणेफेक वेस्ट इंडीजने जिंकला
लॉर्ड्स येथे झालेल्या या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजचा कर्णधार क्लाईव्ह लॉयडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले कारण 100 धावा करण्यापूर्वीच भारताने त्यांचे 4 बळी गमावले. गावस्करांसारख्या दिग्गज खेळाडूलाही केवळ 2 धावाच करता आल्या. श्रीकांत आणि अमरनाथ ही जोडी विकेटवर थोडाकाळ नक्कीच राहिले मात्र वेस्ट इंडीजच्या वेगवान गोलंदाजांनी सामन्यावर आपली पकड कायम राखली. याचा परिणाम म्हणून टीम इंडिया केवळ 183 धावांवर कोसळली. श्रीकांतने भारताकडून सर्वाधिक 38 धावा केल्या.
???? #OnThisDay in 1983, ???? Lord’s – History created! #TeamIndia led by @therealkapildev won the World Cup after beating the mighty West Indies ????#TeamIndia ???????? pic.twitter.com/fKfhICVs5R
— BCCI (@BCCI) June 25, 2020
वेस्ट इंडिजचा डाव
अवघ्या 183 धावा झाल्यानंतर आता विश्वचषक जिंकण्याची भारताची आशा धूसर दिसत होती पण बलविंदर संधूने ग्रीनिजला केवळ 1 धावांवर काढून बाद करत भारताला पहिली आशा दाखवली. यानंतर वेस्ट इंडीजच्या डेसमंड हेन्स आणि विव्हियन रिचर्ड्स यांनी विंडीजची धावसंख्या 50 धावांवर नेली. पण मदन लालच्या एका उत्कृष्ट चेंडूने हेन्सला पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला. यानंतर, विव्हियन रिचर्ड्सची विकेट पडली, त्यानंतर हा संपूर्ण सामनाच पलटला.
कपिल देवचा शानदार झेल
या अंतिम सामन्यात विव्हियन रिचर्ड्स आक्रमक फलंदाजी करीत होता. त्याने 27 चेंडूत 33 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मदन लालचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न त्याने केला आणि चेंडू हवेत गेला. यावेळी कपिल देवने मागे धावत जात विव्ह रिचर्ड्सचा एक अफलातून असा झेल घेतला. रिचर्ड्स बाद झाल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाजांनी विंडीजच्या उर्वरित डावाला ब्रेक लावला आणि वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 140 धावांवर बाद झाला. वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विश्वचषक जिंकण्यात भारतीय संघ यशस्वी होईल, असा विचार कोणाच्याही नव्हता. पण कपिल देव यांच्या सेनेने हा सामना जिंकत क्रिकेटच्या इतिहासातील एका सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.