हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकर हिला 5 लाख रुपये दिले असल्याने याची ईडीकडून चौकशी केली जात आहे. यावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला जात असताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमधील नेते गिरीश महाजन याच्यावर गंभीर आरोप केला आहे. “भाजपला पार्टी फंड देणारा इक्बाल मिर्ची हा दहशतवादीच होता. गिरीश महाजन यांनी तर नाशिकमध्ये दाऊदच्या नातेवाईकांसोबत जेवण केले होते,” असा आरोप खडसे यांनी केला आहे.
एकनाथ खडसे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवाब मलिक याच्यावर आरोप करणाऱ्या भाजपचा आणि भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी खडसे म्हणाले की, नवाब मलिक याचा नाही तर भाजपचाच दहशतवाद्यांशी संबंध आहे. दहशतवादावर नाक मुरडणाऱ्या भाजपला पार्टी फंड देणारा इक्बाल मिर्ची कोण आहे? तो तर दहशतवादी आहे. दाऊदच्या नातेवाईकांसोबत गिरीश महाजन यांनी एकत्र बसून जेवण केलं होतं. मग त्यांचाही दाऊदच्या नातेवाईकांशी संबंध आहे असं म्हणायचं का?,’ असा सवाल खडसे यांनी केला.
दाऊद इब्राहिम यांच्या प्रकरणाबाबत भाजपची दुटप्पी भूमिका आहे. दाऊदशी व्यवहार झाला किंवा दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला म्हणून नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. मलिक यांच्यावरील आरोप अजून ते सिद्ध झालेले नाहीत. एकीकडे भाजपचे नेते दहशतवाद्यांशी संबंध ठेवतात. इक्बाल मिर्चीसारख्या लोकांकडून पक्षासाठी देणग्या घेतात हे काय आहे? ही दुटप्पी भूमिका चालणार नाही. नवाब मलिक हे भाजपला चुकीचे वाटत असतील तर भाजपनंही काही गोष्टींवर खुलासा करावा, असे खडसे यांनी म्हंटले.