पुणे । कोरोनाचे संक्रमण सुरु झाल्यापासून मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे हे त्यांच्या घरी राहत नाहीत. त्यांनी त्यांचा मुक्काम ग्रामपंचायत कार्यालयातच हलविला आहे. संचारबंदीची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यांनी आता मंचरमधील नागरिकांना कोरोना बचावासाठी एक नवीन युक्ती सुचविली आहे तसेच ती अंमलातही आणली आहे. त्यांनी लोकांना छत्री वापरण्यास सांगितले आहे. ज्यामुळे सामाजिक अलगाव राखला जाईल आणि उन्हापासून संरक्षण पण होईल. ते स्वतः हे करत आहेतच पण सोबत त्यांनी गावकऱ्यांनाही ते करण्यास उद्युक्त केले आहे. अनेकांना भेट म्हणून छत्री वाटपही सुरु केले आहे. त्यांच्या या युक्तीची चर्चा राज्यभरात छत्री पॅटर्न म्हणून होत आहे.
आजपर्यँत जनता कर्फ्यू मध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी सर्व जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा दिली आहे. तसेच गावात प्रतिबंधक औषधांची ३ वेळा फवारणी, कोरोना युद्धात काम करणाऱ्या योद्ध्यांचे गौरवीकरण, इन्फ्रारेड थर्मामीटर गणद्वारे नागरिकांची तपासणी केली आहे. गावातील साधन कुटुंबांनी या काळात रेशन धान्य न घेता ते गरजू कुटुंबाला पोहचावे अशी विनंती केली आहे. परप्रांतीय मजुरांना बॅटरी तसेच रिफ्लेक्टिव्ह जॅकेटचे, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप केले आहे.
मंचर पॅटर्न म्हणून राबविलेल्या या उपक्रमाची खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. त्यांनी फोनद्वारे त्यांचे अभिनंदन ही केले आहेत. सरपंच गांजाळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या उपक्रमामुळे गावातील छत्री व्यावसायिकांनाही चांगले दिवस आले आहेत. गावात छोटे-मोठे २० छत्री व्यावसायिक आहेत. प्रत्येक दुकानातून सरासरी १०० ते १२५ छत्र्या खरेदी झाल्या आहेत. संचारबंदीच्या काळात या व्यावसायिकांनाही थोडा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.