औरंगाबाद – वाळूज ते शेंद्रा डीएमआयसीपर्यंत मेट्रो व उड्डाणपुलाचा डीपीआर तयार करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महाराष्ट्र रेल्वे कार्पोरेशनची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आज या कामाचा कार्यारंभ आदेश दिला जाणार आहे. डीपीआरच्या कामासाठी सुमारे पाच कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षीत आहे. पहिल्या टप्प्यात वाळूज ते शेंद्रा डीएमआयसीपर्यंत मेट्रोचा डीपीआर तयार केला जाणार आहे. त्यासोबतच शहरात एकच उड्डाणपूल तयार करण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे मेट्रोसोबतच उड्डाणपुलाचा डीपीआर तयार केला जाणार आहे. मंगळवारी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा आणि मेट्रो, उड्डाणपुलाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी महा मेट्रोची निवड करण्यात आली. महामेट्रो ही केंद्र व राज्य सरकारची संयुक्त कंपनी असल्यामुळे या कंपनीला डीपीआरसाठी लागणारे पाच कोटी रुपये देण्याची तयारी स्मार्ट सिटीने दर्शवली आहे. शुक्रवारी स्मार्ट सिटीतर्फे महामेट्रोला कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
मेट्रो रेल्वे, उड्डाणपुलासह शहराचा सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करण्याचे काम महा मेट्रोला देण्यात आले आहे. हा आराखडा तयार होणार असल्याने शहर विकासातील अडथळे दूर होणार आहेत. आगामी सहा महिन्यात हा आराखडा तयार होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.










