Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 2962

कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

collector

औरंगाबाद – जिल्ह्यासह राज्यभरात कोविड रुग्णांची दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरणासह कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी कोविड 19 ओमिक्रॉन व्हेरीयंट संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनुरूप वर्तनाची तपशीलवार मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आले आहेत. या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, विवाह समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय मेळावे यांमध्ये 50 लोकांची उपस्थितीची मर्यादा आहे. यावर यंत्रणांनी काटेकोर लक्ष ठेवावे. शॉपिंग मॉल्स, बाजार संकुले, यामध्ये एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसर सुरू ठेवण्यास मुभा आहे. तसेच मॉल्सची एकूण क्षमता आणि प्रवेश दिलेल्या ग्राहकांची संख्या याबाबत प्रवेश व्दाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्पष्ट दिसेल अशा ठळक पद्धतीने लावण्यात यावा. कृषी  उत्पन्न बाजार समितीमध्ये  मालांचा लिलाव दिवसातून वेगवेगळ्या वेळा घेता येईल का याबाबत  विचार करण्यात यावा. वरील आस्थापनांसह रेस्टॉरंट, हॉटेल्स ,खानावळी याठिकाणी दोन्ही लसीकरण पुर्ण झालेल्या कामगारांनाच काम करण्यास मुभा राहिल. तसेच प्रवासासाठी दोन्ही डोस लसीकरण हा नियम वाहन चालक/ क्लीनर्स/ इतर सहयोगी कर्मचारी व मनुष्यबळास पालन करणे बंधनकारक राहील. भाजीमंडई तसेच रस्त्यांवर विक्री करणारे भाजी विक्रेता यांनी 2 डोस पूर्ण केलेले असावेत. जर 2 डोस पूर्ण नसतील तर  त्यांनी  RTPCR चाचणी करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी, तसेच इतर संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील व्यापारी ,हॉटेल/रेस्टॉरंट, सिनेमागृह, नाट्यगृह, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण, ट्रॅव्हल्स/बस/टॅक्सी, ऑटो असोसिएशनचे पदाधिकारी दूरदृष्य प्रणाली माध्यमातून बैठकीस उपस्थित होते.

लेकीचा कारनामा ! शेजाऱ्यांच्या मदतीने जन्मदात्या बापालाच लावला चुना

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नागपुरातील बोरखेडी येथील एका तरुणीने शेजाऱ्यांच्या मदतीने आपल्या आजारी वडिलांना लाखों रुपयांचा चुना लावला आहे. या मुलीने बनावट स्वाक्षरीच्या मदतीने आपल्या वडिलांचं बँक खातं रिकामं केलं आहे. तिने आपल्या वडिलांच्या बँक खात्यातील 7 लाख रुपयांची रक्कम स्वत:सह शेजाऱ्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केली आहे. आरोपी मुलीच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, त्यांनी आपलं बँक खातं तपासलं असता हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलीसह शेजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बुटीबोरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सिद्धार्थ रामदास गोंडाने असे तक्रार दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव असून ते बोरखेडी येथील रहिवासी आहेत. सिद्धार्थ रामदास गोंडाने हे रेल्वेतून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी वगैरे मिळून त्यांना 22 लाख रुपये मिळाले होते. यातील पंधरा लाखांची त्यांनी एफडी केली होती. तर बाकीचे पैसे त्यांनी त्यांच्या खात्यात जमा केले होते. यादरम्यान एप्रिल 2021 मध्ये त्यांच्या खांद्याचे ऑपरेशन करण्यात आले होते. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत ते रुग्णालयातच उपचार घेत होते.

याचवेळी आरोपी मुलगी शशिकला हिने या संधीचा फायदा घेत शेजारी टोनी थॉमस जोसेफ आणि त्याची पत्नी मोनिका थॉमस जोसेफ यांच्या मदतीने वडिलांच्या खात्यातील सात लाख रुपये आपल्या खात्यात ट्रान्सफर केले. यानंतर काही दिवसांनी गोंडाने रुग्णालयातून घरी आल्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन खात्यावरील रक्कम तपासली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. तेव्हा त्यांच्या खात्यावर फक्त 27 हजार रुपये शिल्लक होते. या आरोपी मुलीने सात लाख रुपयांचं नेमकं केलं काय? आणि तिने शेजाऱ्यांच्या खात्यात पैसे टान्सफर कशासाठी केले, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. बुटीबोरी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे ‘त्रिशतक’ तर शहरात वाढले ‘इतके’ रुग्ण

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज तब्बल तीनशेहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 317 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 276 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 41 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 384 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 51 हजार 183 झाली आहे. आतापर्यंत एकूण 3658 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1141 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहराच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या भागांत नवे रुग्ण सापडले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला कोरोनाने पुन्हा स्वत:च्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात 32 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील 28 तर ग्रामीणमधील 4 रुग्णांना सुटी देण्यात आली.

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने पुण्यातील जीवरक्षक तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाला लॉकडाऊनमध्ये आपली नोकरी गमवावी लागली. यामुळे या युवकाने नैराश्यात जाऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. हा युवक लाईफगार्ड म्हणून काम करत होता. त्याने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दत्ता पुशीलकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो पुणे शहरातील केशवनगर मुंढवा या ठिकाणी वास्तव्यास होता. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेला लॉकडाऊन, सततच्या निर्बंधामुळे दत्ताची नोकरी गेल्यामुळे तो नैराश्यात गेला होता. याच नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजत आहे.

नोकरी गेल्याने कौटुंबिक कलह
दत्ता पुशीलकर हा पुण्यातील नांदे तलावाचा जीवरक्षक म्हणून काम करत होता. राज्य सरकारने लावलेल्या लॉकडाऊनमुळे त्याला आपली नोकरी गमवावी लागली होती. 2020 पासून काम नसल्याने कौटुंबिक कलहदेखील वाढला होता. अखेर या सगळ्या गोष्टींना कंटाळून त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. त्याच्या या निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

औरंगाबाद – नगर महामार्गावर भरधाव कार हाॅटेलमध्ये घुसली

Accident

औरंगाबाद – औरंगाबादकडुन नगरकडे जाणारी भरधाव कार अचानक हाॅटेलमध्ये घुसली. त्यात दोन जण गंभीर, तर एकाच्या पायाला दुखापत झाली आहे. यात दोन दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना औरंगाबाद- नगर महामार्गावरील जिकठाण फाट्यानजीक (ता.गंगापूर) येथे आज दुपारी दोनच्या सुमारास घडली.

या विषयी अधिक माहिती अशी की, मुख्य महामार्गावरील इसारवाडी फाटा ते शिवराई दरम्यानच्या अंतरावर अपघाताच्या घटना रोज सुरूच आहे. नगरहून औरंगाबादकडे कार (एमएच 20 ईई 5885) ही भरधाव वेगाने जात होती. जिकठाण फाट्याजवळ येताच कार चालकाचा ताबा सुटला. आणि रोडवर उभ्या असलेल्या दुचाकी (एमएच 20 एफझेड 7544) आणि अजून एक अशा दोन दुचाकीचा चुराडा करीत सदरची कार शेजारच्या हाॅटेलमध्ये घुसली. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. तर एकाच्या पायाला किरकोळ मार लागला. शेजारीच क्रिकेटचा सामना सुरू असल्याने त्या ठिकाणी बघ्याची मोठी गर्दी होती. मात्र सुदैवाने या ठिकाणी मोठा अनर्थ टळला. नाना निकम, अरुणा निकम, गंभीर तर ऋषिकेश निकम किरकोळ जखमी झाले.

पुढील उपचारासाठी त्या दोघांनाही नागरिकांनी खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. यात जिकठाण येथील उद्धव खोमणे यांच्या पायाला मार लागला आहे. दोन्ही दुचाक्याची नासधुस करीत ज्या ठिकाणी कार थाबंली त्या जवळच जिकठाण येथील कैलास खोमणे, शिवाजी खोमणे, राजु खोमणे हे ग्रामस्थ चहाचा आस्वाद घेत होते. सुदैवाने हे तिघेही बालंबाल वाचले. अशाच प्रकारे लिंबेजळगाव येथे मागील महिन्यात हाॅटेलात कार घुसून खुर्चीवरील नागरिकाचा मृत्यु झाल्याची घटना सर्वश्रुतच आहे. पुन्हा अशीच घटना ऐज घडल्याने रोडवरील व्यावसायिकात खळबळ उडाली आहे.

पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील गोरेगाव या ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित विवाहित महिलेने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. यानुसार पोलिसांनी कौटुंबीक हिंसाचारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

अजित प्रताप सिंग असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचं नाव आहे. अजित हा गेल्या काही महिन्यांपासून पत्नीला सतत मारझोड करत होता. अगदी क्षुल्लक कारणावरून तो पत्नीला मारहाण करायचा. या आरोपी अजितच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं आत्महत्या केली असल्याचा आरोप मृत महिलेच्या वडिलांकडून करण्यात आला आहे. मृत महिलेचे आरोपी पती अजित प्रताप सिंग याच्यासोबत 10 जानेवारी 2007 लग्न झाले होते. आरोपी अजित हा मृत महिलेच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे. मैत्रीच्या नात्यातून हे लग्न जुळलं होतं. मात्र लग्नानंतर काही वर्षात आरोपी अजित सिंग याने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली.

आरोपी अजितचे अन्य एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. यामुळे या दोघा पती-पत्नीत नेहमी वाद व्हायचे. याच वादातून अजित आपल्या पत्नीला मारहाण करत असे. पतीचे बाहेर सुरू असलेले अनैतिक संबंध आणि सततची होणारी मारहाण यामुळे पीडित महिला सतत चिंतेत असायची. याच चिंतेतून तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मुख्याध्यापकाचे महिलेसोबत विकृत कृत्य; काम असल्याचं सांगत शाळेत बोलावलं अन्…

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणामध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने एका महिलेला शाळेत बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे केले आहेत. या आरोपी मुख्याध्यापकाने शाळेत काम असल्याचे सांगून पीडितेला शाळेत बोलावून घेतले. यानंतर आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून या मुख्याध्यापकाने पीडितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या महिलेने आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करून पोलीस ठाण्यात धाव घेतली.

रुस्तम रामभाऊ होनाळे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे. आरोपी होनाळे हा नांदुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमगाव येथील जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक कन्या शाळेवर मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे. या पीडित महिलेच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अद्याप आरोपी शिक्षकाला अटक केली नसून पुढील तपास सुरु केला आहे.

हि पीडित महिला याच शाळेत शालेय पोषण आहार बनवण्याचं काम करते. घटनेच्या दिवशी शाळेत कुणीही नव्हतं. याचा फायदा घेऊन आरोपीनं शाळेत काम असल्याचं सांगून पीडित महिलेला बोलावून घेतले. काही कार्यलयीन काम असेल म्हणून पीडित महिला शाळेत गेली होती. यावेळी शाळेत कुणीच नसल्याचा फायदा घेत आरोपीनं पीडितेशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. यानंतर घाबरलेल्या फिर्यादी महिलेने कशीबशी आरोपीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली आणि थेट नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. या घटनेमुळे शाळा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

शक्तिशाली गूढ आवाजाने पैठण परिसर हादरला

औरंगाबाद – दोन वर्षानंतर शक्तीशाली गुढ आवाजाने आज पुन्हा एकदा पैठण शहर व परीसर हादरला. 24 फेब्रुवारी, 2020 रोजी पैठण परिसराला गुढ आवाजाचा दणका बसला होता. गेल्या सात वर्षातील गुढ आवाजाचा आजचा 30 वा हादरा होता. विशेष म्हणजे, यापूर्वी पैठण शहराला फेब्रुवारी ते मे महिन्या दरम्यानच असे हादरे बसले आहेत. यंदा मात्र जानेवारीत हादरा बसला आहे. भूकंप मापन यंत्रावर नोंद होत नसलेल्या या गुढ आवाजा समोर जिओलॉजिकल सर्वे ऑफ ईंडियानेही हात टेकले आहेत. नेमका हा आवाज येतो कोठून हा यक्ष प्रश्न मात्र जनतेला भेडसावत आहे.

आज दुपारी 1.53 वा शक्तिशाली गूढ आवाजाने पैठण शहर व परिसर हादरला. पैठण शहराच्या 10 किलोमीटर परिघात या गुढ आवाजाची तीव्रता जाणवली. आवाजाच्या तीव्रतेने नागरिकांमध्ये थोडावेळ चलबिचल झाली होती. पैठण शहरास व परिसरातील अनेक गावांना अशा आवाजाचे हादरे ठराविक कालावधीनंतर सातत्याने बसत आहेत. मात्र प्रशासनाकडून या आवाजाबाबत खुलासा होत नसल्याने जनतेत आवाजाबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. आवाजाची तीव्रता जास्त असल्याने अनेक नागरिकांच्या घराच्या भिंती हादरल्या, छताचे पत्रे थरथरले, खिडकिच्या काचा कंप पावल्या, मातीच्या घराच्या भिंतीची माती घसरली. या प्रकाराने नागरिकांची भितीने गाळण उडाली असे आखतवाडा येथील दादासाहेब म्हस्के, पैठण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया, बाजार समितीचे संचालक राजू टेकाळे, संजू कोरडे, मयुर वैद्य आदींनी सांगितले.

पैठण परिसरात अशा प्रकारच्या गूढ आवाजाचे नियमीत पणे हादरे बसत आहेत प्रत्येक वेळी जनतेत घबराट पसरते, या गुढ आवाजाची शहनिशा करून हा आवाज नेमका कशाचा आहे या बाबत प्रशासनाने खुलासा करावा अशी जनतेतून मागणीही सातत्याने होत आहे. गेल्या 7 वर्षात आजचा 30 वा गुढ आवाज होता. दरम्यान गूढ आवाजाचा हादरा व तीव्रतेत सातत्याने वाढ होत असल्याने जनतेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पैठण परिसरात जायकवाडी सारखे मोठे 102 टी एम सी क्षमतेचे धरण असल्याने शंकाकुशंकेने नागरिकांची झोप उडाली आहे. वारंवार असे धक्के बसत असताना जिल्हा प्रशासन मात्र या बाबतीत मौन बाळगून आहे. प्रशासनाकडून कसलाच खुलासा होत नसल्याने या आवाजाचे गूढ वाढतच चालले आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस

औरंगाबाद – कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व या आजारावर नियंत्रणासाठी उपयोगी ठरणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस (बूस्टर) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज घेतला. यावेळी त्यांनी शासकीय यंत्रणेतील फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, सहविकार असलेले नागरिकांनी दुसऱ्या डोसला 9 महिने पूर्ण झाल्यानंतर लशीचा तिसरा डोस घेण्याचे आवाहन केले.

कोविड अनुरूप वर्तनाचे तंतोतंत पालन करावे. कोरोना संसर्गापासून बचावासाठी मास्क परिधान करणे, शारीरिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. त्याचबरोबर 15 ते 18 वयोगटातील मुलांनीही प्रतिबंधक लस घ्यावी. कोरोनापासून बचाव होण्यासाठी लस अत्यंत महत्त्वाची आहे, असेही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी सांगितले. लस घेतल्यानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयातील सुविधांची पाहणी केली. त्याचबरोबर सीटी स्कॅन यंत्राची पाहणीही त्यांनी केली.

जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हाधिकारी यांनी बूस्टर डोस घेतला. याप्रसंगी जिल्हा सामान्य रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, श्रीमती संगीता चव्हाण, संगीता सानप, लसीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. महेश लड्डा यांची उपस्थिती होती.

चालक- वाहकाची मानसिकता नसताना कामावर पाठविल्याने झाला ‘तो’ अपघात

औरंगाबाद – लातूर-अंबाजोगाई मार्गावर रविवारी सकाळी अपघात झालेल्या लातूर- औरंगाबाद एस.टी.वरील चालक-वाहकांची मानसिकता नसताना त्यांना जबरदस्तीने कामावर पाठविण्यात आले. त्यातूनच अपघात झाला, असा आरोप संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळत, दोन्ही कर्मचारी अनेक दिवसांपासून कर्तव्यावर होते, असे स्पष्ट केले.

सिडको बसस्थानकातून शनिवारी दुपारी तीन वाजता चालक सुभाष गायकवाड आणि वाहक चंद्रशेखर पाटील हे लातूरला बस घेऊन रवाना झाले होते. लातूरहून परत येताना अपघात होईल, असे त्यांना स्वप्नातही वाटले नसावे. या अपघातात वाहक चंद्रशेखर पाटील यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच एस.टी. कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. पाटील यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेनंतर नातेवाइकांनी अपघातस्थळी धाव घेतली.

या दोन्ही कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने कामावर पाठवण्यात आले. त्यांची कर्तव्यावर जाण्याची मानसिकता नव्हती, असा आरोप संपकरी कर्मचाऱ्यांनी केला; परंतु चालक सुभाष गायकवाड हे 12 डिसेंबरपासून कर्तव्यावर होते, तर वाहक चंद्रशेखर पाटील हे २७ नोव्हेंबरपासून कामावर होते. त्यांना जबरदस्तीने कामावर पाठविले नव्हते. लातूर मार्गावर त्यांना कर्तव्य देण्यात आले होते आणि ते गेले, असे सिडको बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक लक्ष्मण लोखंडे यांनी स्पष्ट केले.