“बेगानी शादी में अब्दूल्ला दिवाना”; युपीए अध्यक्षपदाच्या चर्चेवरून प्रवीण दरेकरांचा पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नुकतीच महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावावरून आता भाजपकडून पवारांवर निशाणा साधला जाऊ लागला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली असून “बेगानी शादी में अब्दूल्ला दिवाना. युपीएचं अध्यक्ष पदाचा निर्णय संयुक्तिक नाही, अर्थ नाही,” असे म्हणत पवारांना टोला लगावला आहे.

प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दरेकर यांनी अनेक मुद्यांवर महाविकास अगदी सरकार व शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करण्याचा ठराव पारित करण्यात आला आहे. वास्तविक युपीएच्या अध्यक्ष पदाचा निर्णय संयुक्तिक नाही. त्याला काहीही अर्थ नाही. काँग्रेस सगळं गुंडाळून शरद पवारांना करतील की नाही हा प्रश्न आहे. राज्यात दोन्ही पक्ष शिवसेनेला संपवत आहे हे मात्र नक्की आहे.

मुंबई बॅंक प्रकरणी मला न्यायालयाने दिलासा दिला आहे. सत्तेचा दुरूपयोग करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. प्रमुख नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न केला गेला. वास्तविक त्यांचे नेते जेलमध्ये आहेत म्हणून आमच्यावर काऊंटर अटॅक केला जात आहे. माझी मागणी हि आहे की पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचीही सीबीआय मार्फत चौकशी व्हावी. तशी मागणी मी अमित शहा यांच्याकडेही करणार आहे.