हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. ३०८ काँग्रेस सदस्यांनी काँग्रेसमधील नेतृत्व बदलासाठी सोनिया गांधींना पत्र लिहिलं असून यावर उद्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असा अंदाज आहे. प्रियांका गांधींनीही २ दिवसांपूर्वी काँग्रेसचं नेतृत्व गांधी घराण्यातील कुणाकडे नको अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कोण विराजमान होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांनी पक्षाची धुरा पुन्हा आपल्या हाती घेतली होती. मागील काही काळात काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूशी वाढल्या आहेत. मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बंडखोरी केल्याने तिथलं काँग्रेस सरकार कोसळलं होतं. तर राजस्थानमध्येही पायलट आणि गेहलोत वादात काँग्रेसमधील तणाव वाढला होता. लोकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करत भाजपच्या सत्तेचा वारू चौफेर उधळत असताना काँग्रेस मात्र मागील काहीकाळ गलितगात्र झाली आहे. काँग्रेसला पुन्हा अच्छे दिन दाखवण्यासाठी कोण मसीहा ही जबाबदारी घेणार हे लवकरच स्पष्ट होईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.