अजब! मुरबाडमधील सरपंच सकाळी शिवसेनेत, दुपारी राष्ट्रवादीत तर रात्री भाजपमध्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कल्याण | राजकारणामध्ये सत्तेसाठी कोणी कुठल्या पक्षात जाईल याचा नेम नसतो. सत्तेसाठी रातोरात पक्ष बदलले जातात. अशीच काही घटना मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीनंतर पाहायला मिळाली. येथील सरपंच आणि उपसरपंच विविध पक्षांमध्ये गेल्यामुळे दिवसभर याची चर्चा रंगली होती. आणि राजकारण प्रेमींना चर्चेसाठी विषयही मिळाला होता.

सरपंचपदाच्या निवडीनंतर ग्रामपंचायत नवनियुक्त सरपंच आणि उपसरपंच हे कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदुराव यांच्याकडून शुभेच्छा मिळवत होते. तर हेच पदाधिकारी संध्याकाळच्या सुमारास भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शुभेच्छा स्वीकारताना दिसले. हेच सकाळी शिवसेनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासोबतही पाहायला मिळाले. त्यानंतर तिन्ही पक्षाचे नेते ग्रामपंचायतीवर आपली सत्ता आल्याचे घोषणाकरून सांगत होते. अवघ्या काही तासांच्या अंतरावर घडलेल्या या नाट्याची दिवसभर चर्चा सुरू होती.

सकाळी दोन्ही उमेदवार शिवसेनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासोबत पाहायला मिळाल्यानंतर, सरपंच आणि उपसरपंच यांच्या गळ्यात शिवसेनाचा पंचा टाकत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर नवनियुक्त सरपंच उपसरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेऊन तेथेही पक्षाचा पंचां गळ्यात घातला. आणि त्यानंतर भाजपच्या आमदाराच्या भेटीला जाऊन तिथेही तसा सत्कार स्वीकारला. यामुळे दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस, सकाळी शिवसेना आणि सायंकाळी भाजप अशा 24 तासांमध्ये तीन पक्षांच्या पक्षप्रवेशामुळे भुवन ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांची दिवसभर राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती आणि राजकारण प्रेमींना चर्चेसाठी एक चांगला विषयही मिळाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”