हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शासनाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव अर्थात वारी रद्द केली आहे. मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीला धार्मिक विधी केले जाणार आहेत. तसेच मानाच्या पालख्या या वाहनातून आणल्या जाणार असल्याची माहिती समोर येते आहे. यावेळेला सातारा येथील करहर हे प्रति पंढरपूर मानले जाते. येथेही नागरिकांनी दर्शनासाठी रांगा लावू नयेत म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी सर्व धार्मिक विधी आटोपून मंदिर बंद केले जाणार आहे.
मात्र यावेळी नागरिकांना दर्शनाचा लाभ घेता यावा म्हणून युट्युब तसेच फेसबुक वरून ऑनलाईन दर्शन दिले जाणार असल्याची माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे. सध्या कोरोनाची स्थिती गंभीर असल्याने सर्व विधिवत पूजा ही मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालखी तसेच पादुका भेटीचा कार्यक्रम अगदी मोजक्याच वारकऱ्यांच्या हस्ते पार पडेल. मात्र भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय केली जाईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी भाविकांनी प्रत्यक्ष दर्शनाला मंदिरात येण्याचा अट्टाहास करू नये अशी विनंतीही केली आहे. करहर तसेच परिसरातील इतर गावातील नागरिकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला असून सर्व प्रातिनिधिक सदस्यांनी या दुजोरा दिला आहे. त्यामुळे यावर्षी भाविकांना विठूरायाची भेट ऑनलाईन घ्यावी लागणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.