Tuesday, March 21, 2023

टिकटॉकवरील बंदीनंतर टिकटॉकच्या सीईओनी भारतीय कर्मचाऱ्यांसाठी लिहिले पत्र, म्हणाले की,”…

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाख सीमेवर झालेल्या चकमकी नंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली असून यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. या बंदीनंतर टिकटॉकच्या सीईओने भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक पत्र लिहिले आहे. केविन मेयर यांनी आपल्या या पत्रातून कर्मचाऱ्यांना इंटरनेटचे लोकशाहीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असून त्याला मोठ्या प्रमाणावर यशही मिळाले असल्याचे सांगितले आहे. तसेच आपण आपल्या या संकल्पासाठी कटिबद्द आणि वचनबद्द राहूयात. तसेच शेअर होल्डर्सची चिंताही दूर करण्यासाठी आम्ही सध्या प्रयत्न करत आहोत असेही यावेळी त्यांनी सांगितले आहे.

“भारतीय कायद्यानुसार टिकटॉक सर्व डेटा हा गोपनीयता आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करत असून आणि त्यात वापरकर्त्याची गोपनीयता आणि अखंडता यांना सर्वाधिक महत्त्व दिलं जात आहे,” असंही केविन यांनी या पत्रातून सांगितले आहे. केविन हे टिकटॉकचे मुख्य कार्यकारी तसेच बाइटडान्सचे मुख्य ऑपरेशनल अधिकारीदेखील आहेत. कंपनीच्या वेबसाईटवर त्यांनी ही आपली पोस्ट रिलीज केलेली आहे. ‘भारतीय कर्मचाऱ्यांसाठी संदेश’ असं या पोस्टचं शिर्षक असून केविन यांनी भारतातील सुमारे २० कोटी युजर्सना आपला आनंद, क्रिएटीव्हिटी, अनुभव जगापर्यंत पोहोचवता यावेत यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली असं सांगितलं आहे.

- Advertisement -

“आमचे कर्मचारी हीच आमची मोठी ताकद असून त्यांची काळजी घेणे हीच आमची प्राथमिकता आहे,” असंही केविन यांनी यावेळी सांगितलं आहे. केविन यांनी यावेळी आपल्या दोन हजार कर्मचाऱ्यांना अभिमान वाटेल असा सकारात्मक अनुभव आणि संधी अनुभवण्यासाठी जे काही लागेल ते करण्याचं आश्वासन दिलं आहे. केविन यांनी यावेळी पुन्हा एकदा डिजिटल इंडियामध्ये ऍक्टिव्हली सहभाग नोंदवण्याकडे आपण लक्ष ठेवून असल्याचंही सांगितलं आहे.

“टिकटॉकने जवळपास करोडो युजर्सना वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या कामाचा आनंद घेण्याची संधी दिली. अनेकांना तर यामुळे कमाईच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या. या जागतिक प्लॅटफॉर्मवर आपल्यातील कलेचं प्रदर्शन करताना अनेकांना फक्त फिल्म स्टार तसंच खेळाडूंसाठी उपलब्ध असणाऱ्या ब्रॅण्डचं प्रमोशन करण्याची संधी मिळाली. गाव तसेच खेड्यात राहणाऱ्या अनेक टिकटॉक युजर्ससाठी हे एक सत्य आहे,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

भारत सरकारने टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस यासारख्या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली आहे. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे ही बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले हे घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही एक अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने या बंदीचे आदेश जारी करताना म्हटले आहे. हे हानीकारक असलेले अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच लोकांमधूनही या अ‍ॅपबाबत सतत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.