विशेष प्रतिनिधी । राहुल दळवी
शिवसैनिक हा शिवाजी महाराजांचा मावळा असून त्यांच्यासाठी शिवसेना कायम उभी राहील हा आशय घेऊन दसरा मेळाव्याचं भाषण उद्धव ठाकरेंनी आज पूर्ण केलं. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन करण्याची संधी शिवसेनेला या माध्यमातून मिळाली होती, आणि काही महत्वपूर्ण घोषणा करत शिवसेनेने ती साधली. देशाला स्थिर सरकार देण्यासाठी आणि सेनेच्या स्थापनेपासूनचा हिंदुत्वाचा मुद्दा जिवंत ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजपला पाठिंबा दिला असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, १ रुपयात आरोग्य चाचणी उपलब्ध करून देणे, १० रुपयांत जेवणाची व्यवस्था करणार अशा काही घोषणा यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात केल्या. जोपर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचं टार्गेट आम्ही आहोत, तोपर्यंत आमचं टार्गेटसुद्धा हेच दोन पक्ष असतील असं उद्धव ठाकरे पुढे म्हणाले. सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष आता थकलेत असं विधान आज दुपारीच सोलापूरमधील सभेत केलं होतं, या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत आता थकलाय तर आराम करा, पण आमच्या विजयाचे पेढे खाण्यासाठी तरी नवी ऊर्जा अंगात आणा असा टोला त्यांनी शिंदेंना लगावला.
महायुती कोणत्याही कलहाविना झाली याबाबत समाधान व्यक्त करताना, जागावाटपात ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांची जाहीर माफी उद्धव ठाकरे यांनी यावेळी मागितली. तिकीट नाही मिळालं तरी नाराज न होता शिवसैनिकांनी आपलं काम करावं असं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं. विशेष कायदा करून राम मंदीर बांधण्यात यावं अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी यावेळी मोदी सरकारला केली. राम मंदिराची मागणी आम्ही कोणत्याही अटीवर मागे घेणार नाही असंही ठाकरे यावेळी म्हणाले.
शरद पवार आणि ईडीच्या प्रकरणाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर १९९२ नंतर झालेल्या पोलीस कारवाईचा दाखला दिला. सुडाचं राजकारण करणं हे पवारांसाठी नाही असं म्हणत अजित पवार हे त्यांच्या कर्माची फळे भोगत असून आता जर शेती करायचा विचार करणार असतील तर मोकळ्या धरणाचं करणार काय याचं उत्तरही त्यांनी द्यावा असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
अवघ्या ३५ मिनिटांत शिवसेना पक्षप्रमुखांनी आपलं भाषण आटोपतं घेतले. मागील २ ते ३ वर्षांतील भाषणांपेक्षा यंदाचं भाषण हे तुलनेने कमी आक्रमक आणि सपक झाल्याचा अनुभव उपस्थित दर्शकांनाही येत होता. तडजोड करणं आवश्यक असल्याचं सांगत वाटचाल करणाऱ्या उद्धव ठाकरेंना आणि पर्यायाने शिवसेनेला येत्या निवडणुकीत कशा प्रकारचं यश मिळतं हे पाहणं रंजक ठरणार आहे.