सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
अनैतिक संबंधाच्या संशयावरून सांगलीच्या कुपवाड येथील सचिन अण्णासो सुतार या ३० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने तब्बल ५७ वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मिरज ते कुपवाड रस्ता परिसरातील बडे पीर दर्ग्याजवळ खुनाची घटना घडली. तिघा हल्लेखोरांनी हा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे. तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कुपवाड येथील शिवशक्तीनगर परिसरात राहणारा सचिन सुतार हा फॅब्रिकेशनचा व्यवसाय करत होता. आज सकाळी आठच्या सुमारास तो दुचाकीवरून मेहुणे चंद्रकांत सुतार आणि त्याच्या कामगारासह कामासाठी निघाला होता. ट्रिपल सीट तिघेजण कुपवाडहून मिरज रस्त्यावरून निघाले होते. त्याचवेळी मागून तिघेजण दुचाकीवरून आले. बडे पीर दर्ग्याजवळ तिघांनी दुचाकी आडवी मारून सचिनला अडवले. त्यानंतर हल्लेखोरांनी सुऱ्यासारख्या धारदार शस्त्रांनी सचिनवर हल्ला चढवला. हातावर, पाटीवर, छातीवर आणि पोटावर हल्लेखोरांनी तब्बल ५७ वार त्याच्यावर केले. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अवघ्या काही सेकंदात सचिनचा तडफडून मृत्यू झाला.
सचिनवर हल्ला सुरू असतानाच मेहुणा आणि कामगारांनी घटनास्थळावरून पलायन केले. खुनाची माहिती मिळताच कुपवाड पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. दरम्यान सचिनच्या खुनामागे अनैतिक संबंधाचे कारण असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. त्यातूनच त्याचा निर्घृण खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी तिघा संशयितांना कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.




