ठाकरेंच्या हातातला राज्याचा रिमोट कंट्रोल पवारांच्या हाती; प्रवीण दरेकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मुद्यांवरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेत पुढाकार घेतला. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. एकेकाळी राज्याचे पॉवर स्टेशन मातोश्रीवर होते. बाळासाहेब ठाकरेंच्या हातात रिमोट कंट्रोल होता. आता हा रिमोट कंट्रोल यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांच्या हातात गेला आहे. त्यामुळे त्यांनी आता लवकर एसटी विलीनीकरणाचा निर्णय घ्यावा, असा टोला दरेकर यांनी लगावला.

भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करीत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी कर्मचार्याच्या प्रश्नी घेतलेल्या पुढाकारवरून निशाणा साधला. दरेकर म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना कोरडी सहानुभूती नको आहे. एकेकाळी राज्याचे पॉवर स्टेशन मातोश्री वर होते. बाळासाहेब ठाकरेंच्या हातात रिमोट कंट्रोल होता. आता हा रिमोट कंट्रोल यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांच्या हातात गेला आहे. एसटीचे विलीनीकरणाचा निर्णय सरकारने जाहीर करावा, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

यावेळी प्रवीण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही हल्लाबोल केला. राज्यातील एसटी कर्मचारी एसटीच्या मागणीसाठी गळ्या चौदा दिवसापासून आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत. ते काही खुळे नाहीत. त्यांना बरे वाईट सगळे समजते. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता कर्मचाऱ्यांच्या बुद्धीमत्तेवर प्रश्न उपस्थित करू नये, अशा शब्दात दरेकर यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.