हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशातील महत्वाच्या अशा पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. उत्तर प्रदेश, गोवा या ठिकाणी भाजपचे उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येत आहेत. भाजपा यशस्वी कामगिरी करत असल्याने महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांकडून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान भाजप नेते गिरीश महाजन यांनी या निकालावरुन शिवसेना, काँग्रेसवर जोरदार टीका केली. “उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है,” असा इशाराच महाजन यांनी दिला.
भाजपच्या निवडणुकीतील निकालाबाबत आज भाजपा नेते गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है. भाजप विरोधात बोलण्यात आलेले सर्व एग्झिट पोल फेल ठरतील. देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य केले आहे. भाजपाचे विचार, कर्तृत्व, बोलणं यावर लोकांचा विश्वास आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. शिवसेना भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आली आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवला. यांना काही नुसती तोंडाची बडबड करण्याशिवाय यांना काय जमतं. पुढच्या निवडणुकीत दोन खासदार आणि 20 आमदार निवडून आणून दाखवावे.
पंजाब सोडलं तर इतर राज्यांमध्ये भाजपाने मुसंडी मारली असून बहुमताकडे जात आहेत. याउलट काँग्रेसने पाचही राज्यात एकुण 690 च्या आसपास जागा लढवल्या, पण त्यांना एकूण 35 जागाही मिळत नाहीत. इतकी वाईट अवस्था काँग्रेसची झाली आहे, अशी टीका महाजन यांनी यावेळी केली.