शरद पवार – उद्धव ठाकरे झारीतील शुक्राचार्य; भाजप नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात सध्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या मुद्यांवरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर सतत हल्लाबोल केला जात आहे.  दरम्यान, आज भाजपचे नेते सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे  यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. “ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यांवर छगन भुजबळ मोर्चे काढतात. मात्र, मुख्यमंत्री आणि शरद पवार काही बोलत नाहीत. यातील कुणीतरी झारीतील शुक्राचार्य आहेत,” अशी टीका बावनकुळेंनी केली आहे.

भाजपचे नेते सरचिटणीस बावनकुळे यांनी अनेकवेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ओबीसी आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ओबीसी आरक्षण 1997 ला 27 टक्के आरक्षण मिळाले होते. 31 जुलै 2919 ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश काढून ओबीसी आरक्षण टिकवले, असे बावनकुळे यांनी म्हंटले आहे.

ओबीसीच्या राजकीय आरक्षणाविषयी बावनकुळे म्हणाले की, ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी आता छगन भुजबळ यांनी पुढाकार घ्यावा ,भाजप त्यांना नक्की मदत करणार. शरद पवार, मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात यांच्यापैकी कुणीतरी झारीतील शुक्राचार्य आहेत. त्यांना आपल्याला डिसेंबर 2022 पर्यंत ओबीसी आरक्षण द्यायचं नाही, असा आरोपही यावेळी बावनकुळे यांनी केला.

You might also like