मुंबई । काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव असल्याच्या चर्चेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं आहे. काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठीचा प्रस्ताव असल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. जनता दरबारानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.
काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव आल्याच्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. अशा बातम्यात काहीही तथ्य नसते. महाविकास आघाडी एक वर्षापूर्वी अस्तित्वात आली तेव्हा सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीनही नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घेतलेले आहेत. ते संपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम आम्ही करतोय, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. याशिवाय प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात बाकीच्यांनी चर्चा करण्याचे कारण नाही,” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
दरम्यान, नाना पटोले आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव अंतिम झाल्याने राजीनामा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पटोले यांनी काल राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. पटोले सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील मंत्र्याची भेट घेऊन आभार मानणार. त्यानंतर विधानसभेत येऊन राजीनामा देण्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.