नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णांची संख्या साडेतीन लाखाच्यावर गेली आहे. आतापर्यंत प्रत्यक्ष या युद्धात सहभागी असणाऱ्या अनेकांना कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनादेखील कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. देशातील काही मान्यवरांना कोरोनाचे निदान होत असताना आता दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनाही कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. संचारबंदीचा पाचवा टप्पा सुरु झाल्यापासून दिल्लीतील रुग्णसंख्या मोठ्या संख्येत वाढताना दिसत होती त्यातच आता आरोग्यमंत्र्यांना देखील कोरोनाचे निदान झाल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, कोरोनाविषाणू चे संक्रमण रोखण्यासाठीच्या देशव्यापी संचारबंदीचा आज पंचाहत्तरावा दिवस आहे. भारतात एकूण ३ लाख ५४ हजार ६५ रुग्णसंख्या नोंदविली गेली आहे. यामध्ये १ लाख ५५ हजार २२७ रुग्ण उपचार घेत आहेत. १ लाख ८६ हजार ९३४ रुग्ण बरे झाले आहेत. देशात ११ हजार ९०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूचा प्रसार काही मोठ्या राज्यांत व शहरात अधिक होत असल्याचे लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यातील विद्यमान चाचणी क्षमतेचा पुरेपूर उपयोग करावा आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी काम करावे असे सांगितले.
गेल्या २४ तासात भारतामध्ये २ हजार ३ रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. १० हजार ९७४ नवीन रुग्ण देशभरात आढळून आले आहेत. जागतिक पातळीवर आतापर्यंत ८१ लाख ५५ हजार २६६ रुग्ण आढळून आले आहेत. ४ लाख ४१ हजार ५०५ मृत्यू झाले आहेत. ३९ लाख ४५ हजार ७६३ रुग्ण कोरोनातून उपचार घेऊन बरे झाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.