हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसात ठाण्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने जिल्ह्यात पुन्हा संचारबंदीचा निर्णय घेणयात आला आहे. म्हणूनच १ जुलैपासून पुन्हा ठाणेकरांना संचारबंदीचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत. ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिका आयुक्तांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाउन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.१ जुलैच्या मध्यरात्रीपासूनच संचारबंदीची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना मुंबईला ये जा देखील करता येणार नाही आहे.
१ जुलैपासून केवळ अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांनाच ठाण्यात प्रवासाची परवानगी असणार आहे. मासळी बाजार देखील बंद राहणार आहे. उल्हासनगर, भिवंडी तसेच नवी मुंबईमधील कंटेन्मेंट झोनमध्ये याआधी संचारबंदीची घोषणा करण्यात आली होती. पण आता ठाण्यातही सातत्याने रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपासून या निर्णयाची केवळ चर्चा सुरु होती मात्र आज पोलीस आणि महापालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर संचारबंदीचा अधिकृत आदेश देण्यात आला आहे.
संचारबंदीचे निर्बंध शिथिल झाल्यापासून ठाण्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडताना दिसत होते. ठाण्याचे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी नियम पाळण्याचे आवाहनही केले आहे. “ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ठाणे, कल्याण-डोंबवली, भिवंडी, उल्हासनगर या चार महानगरपालिका आणि अंबरनाथ, बदलापूर या नगरपालिकांमध्ये दिवसेंदिवस करोना रुग्णांची वाढ होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी घऱात राहणं अपेक्षित आहे. गरजेच्या गोष्टी, कामांसाठी खासगी कार, टॅक्सी, रिक्षा ज्यामध्ये एक अधिक अशा दोघांना आणि दुचाकीवर एकालाच परवानगी आहे. असं असतानाही लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे. यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. कंटेनमेंट झोन, रेड झोन वाढत आहेत,” असं अमित काळे यांनी सांगितलं आहे. याबरोबरच अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडल्यास कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.