सोलापूर प्रतिनिधी | शहरातील सोलापूर रस्त्यावरील पारधी वस्ती येथे काही व्यक्तींकडून कोरोना नावाच्या देवीची स्थापना करण्यात आली आहे. स्थापना केलेल्या देवीला खुश ठेवण्यासाठी कोंबडे, बकरे आदींचा बळी देवून तिचे पूजन केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. एका ठिकाणी टाईल्स फरशीचा छोटासा कट्टा करून, दुसऱ्या एका ठिकाणी लहान गोलसर दगड ठेवून, आणखी एका ठिकाणी अनेक फोटोंसह देव्हारा असलेल्या देवघरात लिंबू ठेवून कोरोना देवीची स्थापना झाली आहे. कोरोना महामारीमुळे कोरोनाआईची स्थापना व पूजन केल्याचे तेथील नागरिकांनी सांगीतले असून देवीच्या सेवेने आमचे वाईट होणार नसल्याची त्यांची श्रध्दा आहे.
कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातल्याने वैद्यकिय यंत्रणा, शासन आणि प्रशासन त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. परंतु बार्शीतील पारधी समाजाने २१ व्या शतकात देखील कोरोनाचा बिमोड करण्यासाठी कोरोना देवीची स्थापना करून त्याचे पूजन केल्याने त्यांचा अशिक्षीतपणा उघड झाला आहे. देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी शास्त्राच्या प्रगतीतून भारताला जगातील महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु आजही शेवटच्या घटकांपर्यंत ज्ञानगंगा न पोहोचल्याने, पारधी समाजासारखे अनेक समाज घटक हे सामाजिक प्रगतीपासून कोसो दूर राहिल्याचे वास्तव दिसून येत आहे. केवळ शिक्षणाच्या अभावामुळेच हे घटक त्यांच्या वििवध प्रकारच्या हक्कांसाठी वंचित राहिले आहेत. या अडाणीपणाचा फायदा उचलून काहीजण त्यांची पिळवणूकही करत आहेत. सध्याच्या परिस्थितीत पारधी समाजाकडून होणाऱ्या कृतीला शिकलेला समाज अंधश्रध्दा म्हणेल, परंतु त्याच समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकिय व प्रशासकिय यंत्रणेने चांगले दर्जेदार शिक्षण देवून शिक्षीत केल्यास तोच समाज स्वत:च्या पायावर उभारण्यासाठी, प्रतिष्ठा मिळण्यासाठीची धडपड करेल, त्यांना योग्य त्या मार्गाने समजावून सांगीतल्यास आपल्या चुका लक्षात येतील व आपण अंधश्रध्दा बाळगत होतो आणि तो चुकीचा मार्ग होता हे त्यांच्या लक्षात घेवून इतरांनाही साक्षर करण्यासाठी पुढाकार घेतील. चांगला सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. असे झाल्यास यातूनच देशाचा महासत्तेकडे वाटचाल करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
देवाच्या दयेने आम्हाला सर्दि नाही ना खोकला नाही ना कसला त्रास नाही, इथे आम्ही कोरोनादेवीची स्थापना केली आहे. दर सणाला नैवेद्य, उद, कापूर, दिवे लावायचे आणि पाया पडायचे, देवीमुळे आमच्या केसालाही धक्का लागत नाही, ज्याचा त्याचा मान दिला तर काही होत नाही. कोराेनामुळे मयत झाल्यावर हात लावू देत नाही, पॅक करून देता, किडण्या काढून घेता की काय हे माहित पडत नाही.
– पाराबाई भगवान पवार
करूनाबाईने मला कोरोनामधून वाचविले,
– साहेल परशू काळे
करूनाबाईसाठी काेंबडे कापले जातात, देवासाठी हा प्रकार होतो.
– बाली सोमनाथ पवार
आमचा रोग जावा, सुख मिळावे म्हणून करूनाबाईला इथे जागा दिली. देवाच्या क्रपेमुळे ताेंडाला कपडे लावायची गरज नाही.
– सोमनाथ परशूराम पवार
या जागेवरच करूणादेवीची स्थापन केली, आम्ही तिला मरेपर्यंत माननार, आखाडाच्या महिन्यापासून हे सुरू आहे. यापुढेही आयुष्यभर सांभाळणार, देवीपासून आमचे चांगले.
– कमलाबाई रोहिदास पवार
आमच्या नातीला दिसली, तोंडाला कपडा बांधून ती आली होती. मला जागा द्या म्हणाली, देवळापाशी जागा दाखवते म्हणाली.
– चंपाबाई बाबू काळे
माणसाचे मन भावनिकतेने विचार करते, त्यातूनच अंधश्रध्देच्या आहारी गेल्याचे दिसून येते. कोरोना या विषाणूजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, शािररीक अंतर हाच सध्या तरी उपाय असल्याचे आरोग्य संघटनेने सांगीतले आहे. यापूर्वी देवी नावाच्या रोगाचे मोठ्या संख्येने रूग्ण होते त्यावर संशोधकांनी लस शोधून त्याचे निर्मूलन करण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले. कोरोनाच्या नावाखाली कोणी अंधश्रध्दा पसरवत असेल तर वैज्ञानिक द्रष्टीकोनातून अशा प्रकारच्या अंधश्रध्देचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे, आरोग्यासाठी कोरोना रोगाचे मार्गदर्शन झाले पाहिजे.
– विनायक माळी, अंधश्रध्दा निर्मूलन समिती सदस्य
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.