सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे. बाळासाहेब पाटील म्हणाले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. मात्र संचारबंदीमुळे अंमलबजावणीत काही अडचणी आल्या होत्या. आता तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
राज्यात कोविड -१९ चे संकट आल्यामुळे सर्वच स्तरावर उपाययोजना सुरु होत्या. अशा काळात सामाजिक अलगावच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक होते. मात्र आता हळूहळू संचारबंदीचे नियम शिथिल केले जात आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तिसऱ्या यादीतील राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.
सध्या खरीप परेणीचा हंगाम सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा यासाठी ही योजना राबविण्यात येते आहे. २ हजार कोटी रक्कम यासाठी वर्ग करण्यात आली आहे. जुलै अखेरपर्यंत सव्वा आकरा लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रु. ८ हजार २०० कोटी रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा अद्याप लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे सहकार मंत्री यांनी आवाहन केले.दरम्यान कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोविड-19 च्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज द्यावे अशा सूचनाही शासनाने बँकांना दिल्या होत्या असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.