निसर्ग चक्रीवादळाची भीती: मुंबईसह इतर भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था। अरबी समुद्रात ठिकठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याची माहिती हवामान खात्याने काही दिवसांपूर्वी दिली होती. केरळ किनारपट्टीवरचा कमी दाबाचा पट्टा ज्यावर महाराष्ट्रातील मान्सून अवलंबून होता. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत होता. या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता वाढून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याचप्रमाणे गेल्या १०४ वर्षात प्रथमच मागच्या वर्षी अरबी समुद्रात ५ चक्रीवादळे घोंगावल्याचीही माहिती देण्यात आली होती. अरबी समुद्रात चक्रीवादळ येण्याची शक्यता वाढली असून प्रशासनाकडून त्याच्या व्यवस्थापनाची पूर्वतयारी केली जात आहे. यासाठी मुंबईसह इतर भागात एनडीआरएफच्या ९ टीम तैनात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

अरबी समुद्रातील चक्रीवादळाची स्थिती पाहून या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. यातील ३ टीम मुंबईमध्ये, २ टीम पालघर मध्ये आणि उरलेल्या प्रत्येकी ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफच्या टीम किनारी प्रदेशात सर्वेक्षण करीत आहेत. या टीम महाराष्ट्र शासनाच्या पुनर्वसन विभागाच्या तसेच हवामान खात्याच्या संपर्कात आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंडळाने या टिमना दुप्पट आपत्तीला सामोरे जाण्याइतपत प्रशिक्षित करण्यात आले असून त्या सज्ज असल्याचे सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कोळी लोकांना चक्रीवादळाची शक्यता असल्याने समुद्रात कोणतेही साहसी काम करू नका असे आवाहन केले आहे. त्यांनी पुढच्या २-३ दिवसात चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नका असे सांगितले आहे. राज्यात कोरोनाचे थैमान सुरु असताना आता अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या शक्यतेचा नवा धोका उद्भवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.