हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना संक्रमणाचे सावट पसरलेले आहे. ठिकठिकाणी सॅनिटायझर ने हात धुण्याची आणि मास्क वापरण्याची जागृती केली जात आहे. विविध वेशभूषा करून कलाकृतींच्या माध्यमातून मास्क वापरण्याची सध्याची आवश्यकता सांगितली जात आहे. एकूणच कोरोना विषाणूच्या या युद्धात मास्क हे एक प्रमुख शस्त्र बनले आहे. न्यूयार्कमधील निडर मुलीचा पुतळा, तैवानमधील कन्फ्यूशिअस पुतळा, जीनिव्हाच्या किनाऱ्यावरचा फ्रिडी मर्क्युरीचा पुतळा आणि इंग्लड मधील राणी व्हिक्टोरियाचा पुतळा काही दिवसांपासून या सर्वांमध्ये एक सामान्य गोष्ट आहे. ती म्हणजे या सर्व पुतळ्यांना मास्क लावण्यात आले आहेत.
जगभरात विविध ठिकाणी मास्क हे कोरोनाची लढाई जिंकण्याचे एक शक्तिशाली शस्त्र आहे आणि ते असेल तरच आपण हसू शकू असा संदेश दिला जात आहे. जोपर्यंत आपण शत्रूचा पूर्णतः नायनाट करणार नाही तोपर्यंत आपण हार मानणार नाही असेच जणू सर्वजण सांगत आहेत. काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे ही फॅशन बनली होती पण आता ती सर्वात महत्वाची गरज बनली आहे. त्यामुळे जगभरात मास्क बनविण्यात लोक व्यस्त झाले आहेत. अशीच काही उदाहरणे नुकतीच पाहण्यात आले. बँकॉक मधील एका मंदिरात नृत्याच्या वेळी थाय नृत्यांगनांनी नृत्य सादरीकरणाच्या वेळी मास्क लावला होता. शांघाय बॅलेट कंपनीतील नर्तक मास्क लावून प्रशिक्षण देत होता. ब्राझीलचा फॅशन फोटोग्राफर मर्सिओ रॉड्रिग्ज टाकाऊ पासून टिकावू मास्क बनवतो आहे.
एकूणच चित्र पाहता कोरोना विषाणूची लढाई लढण्यासाठी आणि ती जिंकण्यासाठी जगभरातील लोक एकवटले आहेत. आणि मास्कच्या पाठीमागे असणाऱ्या हास्यातील आत्मविश्वासाने ही लढाई जिंकेपर्यँत हार न मानण्याचे सर्वानी ठरविले आहे. अशा प्रकारे विविध माध्यमातून लोकांना आपण एकत्र असल्याची आणि एकमेकांच्या साथीने एकत्र ही लढाई जिंकण्याची ग्वाहीच दिली जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.