औरंगाबाद प्रतिनिधी | अनैतिक संबंधातून जन्मलेल्या नवजात शिशूचा चौघांनी खून केल्याचा धक्कादायक उलगडा सिटीचौक पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. रतनलाल भोलाराम चौधरी , हरिषकुमार सुभाषलाल पालीवाल , गीता अजय नंद आणि गंगाबाई रतनलाल चौधरी अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने या आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान धावणी मोहल्ला भागातील गीता नंद या महिलेच्या पतीचे १६ ते १७ वर्षींपुर्वी निधन झाले आहे. पतीपासून तिला आठ ते दहा वर्षांची मुलगी आहे. याप्रकरणातील हरिषकुमार पालीवाल हा महानगर पालिकेचा वॉर्ड सफाई निरीक्षक होता. पालीवाल व गीताचे काही वर्षांपासून अनैतिक संबंध होते. त्यातून ती गर्भवती राहिली. पाच महिन्यांची गर्भवती असताना गर्भपात करण्यासाठी तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, गर्भपात शक्य नसल्याने तिची घरीच प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढे २९ एप्रिल रोजी पहाटे गीताची प्रसूती झाली. तिने जन्म दिलेल्या बाळाला शेजारी राहणा-या रतनलाल चौधरी आणि गंगाबाई चौधरी यांच्या मदतीने लगेचच शहागंजातील पेट्रोलपंपाजवळ असणाऱ्या पत्र्याच्या शेडमधील ऊसाच्या चिपाटाच्या ढिगा-याखाली पुरले होते. त्यानंतर २९ एप्रिल रोजी सकाळी पावणेसहाच्या सुमारास एका कुत्र्याने बाळाचे शिर राजाबाजारातील कवटीच्या वाड्याशेजारी आणून टाकले होते. हा प्रकार तेथून जात असलेल्या महानगर पालिकेच्या घंटागाडीवरील सूरज साळवे यांना वॉचमन चौधरी यांनी सांगितला होता. त्याचवेळी नागरिकांनी देखील कुत्र्याच्या तावडीतून बाळाचे शिर सोडवले होते.
या घटनेची माहिती मनपाच्या वॉर्ड साफसफाई सुपरवायझर सतीष मगरे यांनी सिटीचौक पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी धाव घेऊन बाळाचे शिर हस्तगत केले होते. मात्र, त्याचे धड आढळून आले नाही. शेवटी बेगमपुरा भागातील स्मशानभूमीत बाळाच्या शिराचा अंत्यविधी करण्यात आला होता. आता या सर्वांना सिटीचौक पोलिसांनी अटक केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.