एकनाथ खडसेंसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार? काय आहेत शक्यता जाणून घ्या

मुंबई | भाजप नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजपला रामराम ठोकला आहे. खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश पक्का समजला जात आहे. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी कॅबिनेट मंत्री करणार असल्याची चर्चा आहे. खडसे यांना मंत्रीपद द्यायचे झाले तर राष्ट्रवादीला एका विद्यमान मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातीप मंत्र्याला यासाठी राजीनामा द्यावा लागू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

एकनाथ खडसे येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. खानदेशातील काही माजी आमदार, नगरसेवक यांच्या चमूसह खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश होणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीकडून खडसे यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद दिले जाणार आहे. मात्र सध्या महाविकास आघाडीतील सर्व मंत्रीपदे भरली गेलेली असल्याने यासाठी एका विद्यमान मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष संघटना मजबूत आहे. खडसेंना मंत्रीपद देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे कॅबिनेट तर दत्तात्रेय भरणे हे पश्चिम महाराष्ट्रातून राज्यमंत्री आहेत. तसेच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद दिले जाणार असल्याची चर्चा माध्यमांत सुरु आहे. आव्हाड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्ष पद स्विकारल्यास खडसेंची अन्य मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार नाही. कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड या दोन मंत्र्यांपैकी एकाला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो अशी शक्यता आहे.