Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2923

महावितरणच्या वाहनावर चोरांचा डल्ला; भरदिवसा दोन लाख लंपास

औरंगाबाद – वैजापुरातील महावितरणच्या कार्यलायसमोरील वाहनातून दोन लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या वीजबिलापोटी वसूल केलेली ही रक्कम होती. ही रक्कम महावितरणच्या कार्यालयासमोरील वाहनात होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास वाहन चालक आणि कर्मचारी ही रक्कम वाहनात ठेवूनच चहा प्यायला गेले होता. हाच बेजबाबदारपणा कर्मचाऱ्यांना भोवला आणि चोरट्यांनी वाहनाची काच फोडून त्यातून सदर रक्कम लंपास केली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव मोइन हे महावितरण कंपनीत तंत्रज्ञ- वायरमन म्हणून कार्यरत आहेत. तालुक्यातील महालगाव विभागाअंतर्गत येणाऱ्या भगूर, एकोडीसागज, बल्लाळीसागज या गावातील वीज बिलांच्या रकमेच्या वसुलीसह दुरुस्तीची कामे मोइन करतात. 15, 16 जानेवारी या दोन दिवसात सदर तीन गावांतील शेतकऱ्यांकडे असलेल्या कृषीपंपांच्या वीजबिलापोटी मोइन यांनी एक लाख 97 हजार रुपयांची वसुली केली होती. ही रक्कम वसूल केल्यानंतर ते वैजापूर येथे आले. शहरातील विश्वकल्याण पतसंस्थेत रक्कम भरण्यासाठी गेले मात्र तेथील सर्व्हर डाऊन असल्याने त्यांनी ती रक्कम वाहनातील डॅशबोर्डमध्ये ठेवून ते नंतर वाहनासह याच रस्त्यावरील महावितरण कार्यालयासमोर गेले. त्यानंतर वाहन उभे करून ते त्यांच्या इतर सहाकाऱ्यांसह चहा पिण्यासाठी गेले. साधारणतः अर्ध्या तासानंतर मोईन वाहनाजवळ आले असता त्यांना एका बाजूच्या दरवाजाची काच त्यांना फोडलेली दिसली. याशिवाय डॅशबोर्डमधील ठेवलेली रक्कम गायब झालेली आढळली. याप्रकरणी उद्धव मोइन यांनी चोरट्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, महावितरणच्या कार्यालयासमोरील वाहनातून खरंच ही रक्कम चोरीला गेली की चोरीचा बनाव करण्यात आला आहे, यादृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला. एकूणच वीजबिलाची ही रक्कम वाहनात ठेवून चहा प्यायला जाणे वायरमनला चांगलेच महागात पडल्याचे दिसून येत आहे.

पटोलेंवर कारवाई करणे हे कर्तव्यच, उपकार नाहीत; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले. दरम्यान, भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारीच आहे की देशाच्या पंतप्रधानांना कोणी जीवे मारण्याची धमकी देत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी. मुख्यमंत्र्यांचे ते कर्तव्यच आहे, उपकार नाहीत असा टोला फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबतीत जे विधान केले, त्यापेक्षा हे भयानक विधान आहे. केंद्रीय मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना रातोरात अटक करणारे पोलीस आता का गप्प आहेत? मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारीच आहे की देशाच्या पंतप्रधानांना कोणी जीवे मारण्याची धमकी देत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी.

मुख्यमंत्र्यांचे ते कर्तव्यच आहे, उपकार नाहीत. कायद्याच्या कितीही चिंधड्या उडवा, वाट्टेल तसा पोलिसी दबाव आणा! भाजपाचा कार्यकर्ता मूग गिळून गप्प बसून सहन करणार नाही आणि या राज्यातील जनताही तुम्हाला माफ करणार नाही. पटोलेंच्या विधानावरून काँग्रेस नेत्यांच्या मनात मोदींजींबद्दल असूया आहे हे दिसते. पंजाबमध्ये पंतप्रधानांचा ताफा अडवणे, त्यानंतर नाना पटोले यांचे विधान अशा प्रकारचे विचार लोकशाहीला घातक आहेत.

मी समर्थन करीत नाही की आमच्या एका कार्यकर्त्याने मुखमंत्र्यांच्या पत्नीला राबडी देवी म्हटलं तर मध्यरात्री त्याच्या घरी पोलीस जातात आणि नाना पटोले मी पंतप्रधानांना मारू शकतो अशी थेट धमकी देतात आणि त्यांच्या विरुद्ध साधी तक्रारही दाखल होत नाही, असे फडणवीस यांनी म्हंटले.

पटोलेंच्या गावात एकही मोदी नाही

नाना पटोले जे काही बोलतआहेत कि मी गावातील मोदी नावाच्या माणसाला बोललो. खोटे बोलत आहेत ते. नानांच्या गावात मोदी नावाची एकही व्यक्ती नाही. त्यामुळे ते कोणाबद्दल बोलले हे स्पष्ट झाले आहे. आता ते घाबरलेत. चारही बाजूने टीका सुरू झाल्याने ते पळ काढत आहेत, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

महाविकास आघाडी तोडण्याचे काम राष्ट्रवादीने केले, शिवसेना- काॅंग्रेस एकत्र : आ. महेश शिंदे

सातारा | सातारा जिल्ह्यात जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने पहिल्यांदा राष्ट्रवादी पक्षाने महाविकास आघाडी तोडण्याचे काम केले. जिल्हा बॅंकेत आम्ही त्यांना दोन जागा मागितल्या होत्या, परंतु त्यांनी आम्हांला जाणीवपूर्वक डावललं. तरीही शिवसेनेच्या तीन जागा आल्या. राष्ट्रवादी जिल्ह्यात केवळ त्याच्या फायद्याच्या ठिकाणी आम्हांला घेणार असतील तर आमच्या फायद्याच्या ठिकाणी त्यांना घ्यायचा प्रश्नच येत नाही. आम्ही काॅंग्रेसला घेवून चाललो असल्याचे कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आ. महेश शिंदे यांनी सांगितले.

कोरेगाव येथील नगरपंचायतीच्या 17 जागेपैकी 13 जागेसाठी यापूर्वीच मतदान झाले आहे. तर उर्वरित 4 जागांसाठी मतदान प्रक्रिया आज सुरू आहे. त्यानिमित्ताने आ. महेश शिंदे आणि आ. शशिकांत शिंदे यांनी नेत्यांनी मतदानांच्या ठिकाणी ठाण मांडले होते. यावेळी आ. महेश शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आ. महेश शिंदे म्हणाले, कोरेगाव नगरपंचायत ही आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. मतदारांच्यात उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही गेल्या दोन वर्षात कोरेगाव शहर व तालुक्यात केलेल्या कामामुळे सत्ता परिवर्तन होणार हे निश्चित आहे.जे जनतेचे प्रश्न सोडवतात, जनतेत राहतात त्याच्यासाठी कष्ट करतात त्यांना सहानभूती मिळते. कोरेगाव विकास परिवर्तन पॅनेलमध्ये शिवसेना आणि मित्रपक्षाचे पॅनेल आहे. विकासकामांच्या जोरावर कोरेगाव नगरपंचायतीत सत्तापरिवर्तन दिसेल.

Share Market : शेअर बाजारात 2022 ची सर्वात मोठी घसरण, यामागील कारणे जाणून घ्या

Share Market

नवी दिल्ली । मंगळवार, 18 जानेवारी 2022 रोजी भारतीय शेअर बाजार खूपच घसरला. याला 2022 मधील सर्वात मोठी घसरण म्हणणे चुकीचे ठरणार नाही. दुपारी एक वाजेपर्यंत शेअर बाजारात काही प्रमाणात वाढ किंवा घसरण होत होती, मात्र त्यानंतर बाजारातील जवळपास सर्वच निर्देशांक घसरायला लागले. सकाळपासून निफ्टी 50 वर दबाव दिसून आला. तो 1.07% म्हणजेच 195.10 अंकांच्या घसरणीसह 18113.00 वर बंद झाला.

BSE सेन्सेक्स 0.90% किंवा 554.05 अंकांनी घसरला. 60754.86 वर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांकाने दिवसभरात चांगली वाढ केली, पण तीही जवळपास कालच्या पातळीवर घसरली. निफ्टी बँक -0.02% किंवा 5.85 अंकांनी घसरून 38210.30 वर बंद झाला.

बाजार एवढा का पडला, ही आहेत कारणे
खराब जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात घसरण झाल्याचे बोलले जात आहे. यानंतर 7 दिवसांच्या वाढीनंतर आज बाजारात नफेखोरीचा बोलबाला राहिला. आजच्या ट्रेडिंगमध्ये मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्स मध्ये विक्री दिसून आली. BSE मिडकॅप निर्देशांक 2.20 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक 1.92 टक्क्यांनी घसरून बंद झाला. आज आयटी, एफएमसीजी, कॅपिटल गुड्स शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. मेटल, ऑटो, रियल्टी निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली.

Nifty 50 चे टॉप 5 गेनर
Axis Bank Ltd. +1.76 %
HDFC Bank +.51 %
ICICI Bank +.46 %
Dr. Reddy’s Labs +.45 %
Kotak Mahindra Bank +.24 %

Nifty 50 चे टॉप 5 लूझर
Tata Consumer Product -4.40 %
Maruti Suzuki India -4.24 %
UltraTech Cement -3.99 %
Eicher Motors -3.80 %
Tech Mahindra -3.58 %

काही वेळातच अर्थमंत्री घेणार पत्रकार परिषद, अर्थसंकल्पाच्या आधी बोलणार हे जाणून घ्या

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन दुपारी 4.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. साधारणपणे अर्थमंत्र्यांची पत्रकार परिषद अर्थसंकल्पापूर्वी घेतली जात नाही. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेबाबत देशाची आणि बाजारपेठेची उत्सुकता वाढली आहे. अर्थमंत्री अर्थसंकल्पापूर्वी एखादे मोठे पॅकेज जाहीर करणार आहेत की, सरकारकडून काही धोरणात्मक घोषणा होणार आहेत, असे लोकांना वाटत आहे.

मनीकंट्रोलने सीएनबीसी-आवाजच्या हवाल्याने ही बातमी लिहिली आहे. CNBC-Awaaz च्या खास सुत्रांकडून असे समजले आहे की, आजच्या पत्रकार परिषदेला बजेट 2022 शी संबंधित कोणत्याही घोषणेवरून पाहण्याची गरज नाही. CNBC-Awaaz चे लक्ष्मण रॉय यांनी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, आजची पत्रकार परिषद सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालासंदर्भात आयोजित केली जात आहे, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने NCLT (देवस मल्टीमीडिया) प्रकरणाचा निकाल दिला आहे. NCLAT चा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.

देवास मल्टीमीडियाबाबत ब्रीफिंग शक्य आहे
आपल्या निर्णयानुसार, NCLAT ने देवास मल्टीमीडिया बंद करण्यास सांगितले आहे, ज्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते आणि आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने NCLT च्या निर्णयाला मान्यता दिली आहे. SC च्या या निर्णयामुळे भारताची बाजू भक्कम होईल, एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय लवादातही भारताची बाजू भक्कम होईल, असे मानले जात आहे. या प्रकरणात सरकार आपल्या बाजूने आल्यास, देवास मल्टीमीडियावर चर्चा करण्यासाठी आणि पत्रकारांना माहिती देण्यासाठी अर्थमंत्री आज पत्रकार परिषद घेऊ शकतात.

यूपीए सरकारच्या काळापासून सुरू आहे हा खटला
लक्ष्मण पुढे म्हणाले की,”सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काल NCLT च्या बाजूने आला, ज्यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय लवादामध्ये चालू असलेल्या अनेक प्रकरणांमध्ये परिस्थिती मजबूत होण्याची अपेक्षा आहे. हे प्रकरण यूपीए सरकारच्या काळापासून सुरू आहे आणि एनडीए सरकारच्या स्थापनेनंतर, या प्रकरणात कठोरता दाखवली गेली आणि सरकारने आपली रणनीती बदलली, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय NCLT च्या बाजूने आला. त्यामुळे सरकारची रणनीती आणि बाजू यावर चर्चा करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी ही पत्रकार परिषद बोलावल्याचे मानले जात आहे.”

देवास मल्टीमीडिया मॅटर काय आहे ?
देवास मल्टीमीडियाबद्दल अधिक माहिती देताना, सीएनबीसी-आवाजचे संपादक शैलेंद्र भटनागर म्हणाले की,”ही बाब 2005 सालची आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि देवास मल्टीमीडिया यांच्यात एक करार झाला होता, ज्यामध्ये इस्रो दोन सॅटेलाईटवर काम करत होते. जे देवास मल्टीमीडियासाठी लाँच केले गेले. हे सॅटेलाईट टेलिकॉम सेक्टरसाठी लाँच केले जाणार होते, जे खूप कमी फ्रिक्वेंसीने लाँच केले जाणार होते, ज्यासाठी कंपनीला खूप कमी टॉवर्स बसवणे आवश्यक होते.

या करारावरून झाला गदारोळ
त्या काळात इस्रो थेट पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीत असल्याने 2005 ते 2010 या काळात या करारावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते आणि बराच गदारोळही झाला होता. सरतेशेवटी हा करार रद्द करण्यात आला, त्यानंतर देवास मल्टीमीडियाने खूप मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाईची मागणी केली आणि NCLT ने त्यांच्या विरोधात निर्णय दिल्यानंतर कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली मात्र तेथेही देवास मल्टीमीडियाची निराशा झाली.

एका जागेवर तरी स्वबळावर लढण्याची हिंमत दाखवा; कसे जाणार साडेतीन जिल्ह्यांपलीकडे?

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने समाजवादी पक्षासोबत युती केली आहे. पहिल्या टप्प्यात समाजवादी पक्षा कडून राष्ट्रवादीला एकमेव जागा देण्यात आली होती मात्र ती सुद्धा सपा ने परत घेतल्याच्या बातम्या आहेत. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

उत्तर प्रदेशातल्या एका जागेसाठी सपाच्या अखिलेश यादव यांच्या पुढे हात पसरूनही काही उपयोग झाला नाही. त्यांनी जागा दिल्यासारख केल काढून पण घेतली. आता शरद पवार साहेब एका जागेवर तरी स्वबळावर लढण्याची हिंमत दाखवा. कसे जाणार साडेतीन जिल्ह्यांपलीकडे? असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आगामी उत्तरप्रदेश,उत्तराखंड आणि गोवा विधानसभा निवडणूक लढवणार आहे. गोव्यात राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. उत्तराखंड येथे राष्ट्रवादीने काँग्रेस सोबत आघाडी केली आहे तर उत्तरप्रदेश मध्ये समाजवादी पक्षासोबत युती केली आहे. शरद पवार हे स्वतः निवडणूकीच्या प्रचाराला उत्तरप्रदेशला जाणार आहेत.

पोलीस आयुक्तालयासमोर एकाचा आत्महत्येचा प्रयत्न, मात्र…

औरंगाबाद – गहाळ झालेल्या माला बाबत ची तक्रार पोलीस घेत नाहीत असा आरोप करत सय्यद आतार हा व्यक्ती पोलीस आयुक्तालय समोर आज सकाळच्या सुमारास विषारी औषधी पिवून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नांना असतानाच वेळीच पोलिसांनी त्याला रोखल्याने पुढील अनर्थ टळला.

सय्यद हे सायकलवर फिरून शहरात कॉस्मेटिक व इतर किरकोळ साहित्य विक्री करतात. त्यानी आणलेला माल हा दुकानात ठेवला असता तेथून तो गहाळ झाल्याचे सय्यद यांचे म्हणणे होते. त्या बाबत पोलिस तक्रार घेत नाहीत, शिवाय वरीष्ठ अधिकारी दखल घेत नसल्याने सय्यद यांनी आज हातात काही फलक व खिशात एक विषारी औषधाची बाटली आणली होती.

सकाळी ते पोलिस आयुक्त कार्यालय समोर आले. त्यावेळी त्यांना पोलिसांनी समजूत घालून तेथून घेऊन गेले. पोलिसांनी वेळीच त्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला.

साताऱ्यात भाजपाचे निवेदन : नाना पटोलेंना अटक करण्याची मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

देशाचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांना ‘मारहाण’ करण्याची धमकी दिल्या बद्दल काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंना अटक करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली. या बाबतची तक्रार भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार यांनी सातारा शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांच्याकडे लेखी स्वरूपात दाखल केली.

तक्रारीत म्हणले आहे की, देशाचे पंतप्रधान हे भारतीय राज्य घटनेनुसार सर्वोच्च पद आहे. त्यांची सुरक्षितता हा सर्व भारतीय व सुरक्षा यंत्रणांचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कोणतेही गैरविधान, गैरकृत्य हे देशाच्या तसेच सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षे विषयी उचल्लेले विरूध्द पाऊल असते. अशाा नेत्या विषयी जाणीवपुर्वक अपशब्द वापरणे, त्यांना मारहाण करण्याची भाषा वापरणे, त्यांच्या हत्तेचा कट रचने या सर्व बाबी देशद्रोहाच्या गुन्हयामध्ये मोडतात. राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यमान प्रदेश अध्यक्ष, नाना फाल्गुनराव पटोले, आमदार भंडारा विधानसभा यांनी काल दि. १७/०१/२०२२ रोजी भंडारा येथे कार्यकर्त्यांना संबोधीत करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशुन, मी मोदीला मारू शकतो’, शिव्याही देऊ शकतो, असे असंसदीय, गुन्हेगारी प्रवृत्तीचे व देशाचे पंतप्रधान यांच्या विषयी त्यांना शारिरीक इजा पोहचविण्याच्या उद्देशाने कार्यकर्त्यांना हाताशी धरून कटकारस्थान रचले आहे हे स्पष्ट होत आहे.

तक्रारीत पूढे म्हणले आहे की, काँग्रेस पक्षाच्या प्रदेश पातळीवरील सर्वोच्च पदावर विराजमान असताना आपल्या जबाबदारीचे व नैतिक नितीमुल्यांचे भान विसरून सदर नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य हे दंडनिय अपराधातील आहे. .
तक्रारीत केंद्रीय मंत्री श्री नारायणजी राणे यांच्यावरील कारवाईचा उल्लेख करताना लिहिले आहे की,महाराष्ट्र पोलीस खाते हे सजग व कृतीशील आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांचेविषयी काढलेले कथीत अनुद्गार या अनुषंगाने राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गत काळामध्ये केंद्रीय राज्यमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. नारायण राणे साहेब यांचे विरूध्द देखील महाराष्ट्र पोलिसांनी सत्वर कायदेशीर कारवाई करत , एफ आय आर दाखल करून त्यांना अटक केली होती.
त्यामुळे प्रस्तुत घटनेचे गांभीर्य व देशाच्या अंतरिक सुरक्षेचा मुद्दा समजून आपण सदर नाना फाल्गुनराव पटोले यांच्या विरूध्द योग्य त्या दंडनिय कलमांच्या अनुषंगाने पंतप्रधानांना धमकावणे, जीवे मारण्याचा कट रचणे, सामाजिक अशांतता पसरविणे, जमावास गुन्हा करणेसाठी प्रवृत्त करणे, देशा विरूध्द कट रचणे इ. सत्वर कायदेशीर कारवाई करावी ,एफ आय आर दाखल करून त्यांना अटक करावी असेही तक्रारीत म्हणले आहे.

या वेळी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. प्रशांत खामकर, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन साळुंखे, भटके विमुक्त महिला जिल्हाध्यक्ष प्रिया नाईक, शहर उपाध्यक्ष नितीन कदम, शहर चिटणीस रवी आपटे, उद्योजक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमोल टंकसाळे, युवा मोर्च्या शहराध्यक्ष विक्रम बोराटे, ओबीसी मोर्च्याचे अविनाश क्षीरसागर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

तुमचेही रेशन कार्ड हरवले आहे का? डुप्लिकेट कार्ड बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या

Ration Card

नवी दिल्ली । सरकारने दिलेले रेशनकार्ड हे अत्यावश्यक डॉक्युमेंट बनले आहे. या कार्डद्वारे रेशनकार्ड धारकांना रेशन मिळते. आधार कार्ड, पॅनकार्ड आणि इतर महत्त्वाच्या डॉक्युमेंट प्रमाणेच रेशनकार्ड हेदेखील सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. आता पीएम किसानमध्ये पैसे मिळवण्यासाठीही रेशन कार्ड आवश्यक झाले आहे. अनेक ठिकाणी आयडी प्रूफ म्हणूनही त्याचा वापर केला जातो.

कधी कधी घाईमुळे किंवा काही कारणामुळे आपण काही गोष्टी गमावतो, ज्या खूप महत्त्वाच्या असतात. कुणाचे रेशनकार्ड हरवले किंवा चोरीला गेले, तर त्याला काळजी वाटणे स्वाभाविक आहे. मात्र जर ते हरवले तर? खरं तर ते त्रास न देता बनवता येते.

रेशनकार्ड हरवल्यास तुम्हाला काळजी न करता काही सोप्या स्टेप फॉलो कराव्या लागतील, त्यानंतर तुमचे डुप्लिकेट कार्ड सहज बनवता येईल. डुप्लिकेट रेशनकार्ड बनवण्याचा ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्ग जाणून घ्या.

अशाप्रकारे ऑनलाइन बनवता येईल डुप्लिकेट रेशन कार्ड –

स्टेप 01: तुमचे रेशनकार्ड कुठेतरी हरवले असेल, तर अशावेळी तुम्हाला डुप्लिकेट कार्ड बनवण्यासाठी तुमच्या राज्याच्या अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

स्टेप 02: वेबसाईटवर गेल्यावर सर्व प्रथम तुमच्या समोर होम पेज उघडेल. त्यानंतर तुम्हाला डुप्लिकेट रेशन कार्डसाठी अर्ज करा या लिंकवर क्लिक करावे लागेल.

स्टेप 03: लिंकवर क्लिक केल्यावर, तुमच्यासमोर एक ऑनलाइन फॉर्म उघडेल, ज्यावर तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेली सर्व महत्त्वाची माहिती भरावी लागेल.

स्टेप 04: यानंतर, विनंती केलेले सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि सबमिट करा. या स्टेप फॉलो करून, तुम्ही डुप्लिकेट रेशन कार्डसाठी अर्ज करू शकाल.

अशाप्रकारे ऑफलाइन बनवता येईल डुप्लिकेट रेशन कार्ड –

स्टेप 01: रेशन कार्ड हरवल्यास, तुम्हाला जिल्हा अन्न व पुरवठा नियंत्रक कार्यालयात जावे लागेल.

स्टेप 02: या दरम्यान तुमच्यासाठी कुटुंबातील सदस्यांचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो असणे अनिवार्य आहे. यानंतर, तुम्हाला डुप्लिकेट रेशन कार्डचा फॉर्म घ्यावा लागेल.

स्टेप 03: फॉर्म भरल्यानंतर, तुम्हाला तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे फोटो याशिवाय डेपो होल्डर रिपोर्ट, पेनल्टी फीसच्या दोन पावत्या सादर कराव्या लागतील.

स्टेप 04: व्हेरिफिकेशन झाल्यानंतर, तुम्हाला माहिती दिली जाईल, त्यानंतर डुप्लिकेट रेशन कार्ड मिळेल.

कोणते डॉक्युमेंट्स लागतील?
डुप्लिकेट रेशनकार्ड बनवण्यासाठी रेशनकार्ड नंबर, सर्व सदस्यांचे आधार कार्ड, कुटुंबप्रमुखाचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि काही महत्त्वाच डॉक्युमेंट्स असणे अनिवार्य आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात भारताचे क्रिप्टोकरन्सी विधेयक येण्याची अपेक्षा फारच कमी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Online fraud

नवी दिल्ली । बहुप्रतिक्षित क्रिप्टोकरन्सी विधेयक संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्राकडून मांडले जाण्याची शक्यता नाही. या गुंतागुंतीच्या प्रश्नावर आणखी विचार आणि चर्चा होणे आवश्यक आहे. त्याच वेळी, यासाठीच्या नियामक चौकटीत एकमत निर्माण करणे देखील आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक येत्या काही महिन्यांत डिजिटल करन्सी सुरू करण्याच्या तयारीत आहे, सरकारही याची वाट पाहत आहे.

या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती ईटीला दिली. ते म्हणाले की,” या अर्थसंकल्पीय अधिवेशनात क्रिप्टो विधेयक सादर केले जाणार नाही. हा एक अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे, ज्यासाठी आणखी वेळ लागेल.”

जागतिक दर्जावर सरकारची नजर
एका न्यूज चॅनेलने सरकारी सूत्रांचा हवाला देऊन एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, “सरकारला हे पाहायचे आहे की, क्रिप्टोकरन्सीवरील जागतिक मानके युरोपियन युनियन (EU) आणि इतरत्र कसे विकसित होतात.”

गेल्या महिन्यात जेव्हा हे विधेयक संसदेच्या अजेंड्यावर आले तेव्हा क्रिप्टोकरन्सी मार्केटला मोठा धक्का बसला. या विधेयकात देशातील सर्व खाजगी क्रिप्टोकरन्सी बंद करण्याचा प्रस्ताव आहे. भारत सरकारला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) लाँच करण्यात स्वारस्य असल्याचेही प्रस्तावित विधेयकावरून समोर आले आहे.

सरकार बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट (BIS) कडून देखील माहिती घेत आहे
सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) देखील क्रिप्टोकरन्सी फ्रेमवर्कला आणखी सखोलपणे समजून घेण्यासाठी स्वित्झर्लंड-बेस्ड बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट (BIS) कडून माहिती घेत आहेत.

क्रिप्टोकरन्सी विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार होते. या महिन्याच्या सुरुवातीला ते मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर या विधेयकावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. हेच विधेयक 2021 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी देखील लिस्ट करण्यात आले होते. त्यावेळीही त्यावर चर्चा झाली नाही.

दरम्यान, भारताच्या क्रिप्टो स्पेसमध्ये बरेच काही घडत आहे. वॉचर गुरू आणि ब्रोकरचूज सारख्या रिसर्च संस्थांच्या अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जगात सर्वाधिक क्रिप्टो गुंतवणूकदार भारतात आहेत. ही संख्या सुमारे 10 कोटी आहे.