मिशन बिगिन अगेनचा तिसरा टप्पा आजपासून सुरु; काय चालू होणार, काय बंद राहणार? 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारने मिशन बिगिन अगेन द्वारे आजपासून राज्यातील काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. संचारबंदीच्या शिथिल झालेल्या नियमांनुसार आजपासून खाजगी कार्यालये सुरु केली जाणार आहेत. १०% कर्मचाऱ्यांना कार्यालयात परवानगी असणार आहे. मुंबईमध्ये जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु केली जाणार आहे. कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील अनेक भागात नियम शिथिल केले गेले आहेत.

आजपासून खाजगी कार्यालये १०% क्षमतेने सुरु राहणार आहेत. कार्यालयांची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ असणार आहे. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका हद्दीत सरकारी कार्यालये १५% मनुष्यबळासह उघडली जाणार आहेत. सर्वाना सामाजिक अलगाव चे नियम पाळावे लागणार आहेत.  जिल्ह्यांमधील बस आणि एसटी सेवा या जिल्ह्यांतर्गत सुरु होणार आहेत. क्षमतेच्या ५०% प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.

हॉटेल्स, रेस्टारंटस, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार, मोठी सभागृहे उघडता येणार नाहीत. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था तसेच प्रशिक्षण संस्था बंदच राहतील. सलून, ब्युटी पार्लर बंद राहतील. विमानसेवा, मेट्रो सेवा पूर्णतः बंद असणार आहेत. धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने अद्याप परवानगी दिली नाही. तसेच रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी राहणारच आहे. वय वर्षे ६५ च्या वरील आणि १० च्या खालील नागरिकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे.

सकाळी ५ ते सायंकाळी ७ या वेळेत सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना पहिल्या टप्प्यात परवानगी देण्यात आली होती.  सामूहिक ठिकाणी गर्दी करण्यास परवानगी नव्हती. लहान मुलांसोबत पालकांनी असणे अनिवार्य असणार आहे. सामाजिक अलगाव पाळणे बंधनकारक आहे. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा अशा तंत्रज्ञानी सामाजिक अलगाव, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करून काम करावे असे सांगण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत एक दिवस आड एका बाजूची याप्रमाणे उघडली जातील. कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम बंद राहतील. कपडे परत घेणे किंवा बदलून देणे याला परवानगी नसणार आहे. सामाजिक अलगाव पाळण्याची जबाबदारी ही त्या त्या दुकानांची असणार आहे. खरेदीसाठी जाताना वाहनाने जाणे टाळण्यास सांगितले आहे. टॅक्सी, कॅब, रिक्षा यासारख्या तसेच चारचाकी वाहनातून केवळ २ प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. दुचाकीवर केवळ चालक जाऊ शकेल असे सांगण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.