पीडीत महिलेकडून लाचेची रक्कम स्विकारली, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचा जमादार सापळ्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | दाखल गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्याचे बक्षीस म्हणून पीडीत महिलेकडून पाच हजाराची लाच स्विकारताना उस्मानपुरा पोलिस ठाण्याचा जमादार शिवाजी दामू गाडे याला एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास उस्मानपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली.

एका महिलेने पती त्रास देत असल्याने त्याच्याविरुध्द उस्मानपुरा पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ही पीडीत महिला तिच्या पतीला सोडून माहेरी राहायला गेली. पतीपासून त्रास होत असल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी या महिलेची मागणी होती. अतिशय हलाखीची परिस्थिती असताना या महिलेला पतीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले म्हणून पाच हजारांची लाच जमादार गाडेने बक्षीसाच्या स्वरुपात मागितली.

मात्र, आधीच हलाखीची परिस्थिती असल्याने महिला वैतागून गेली होती. तिने याबाबत थेट एसीबीकडे तक्रार दिली. त्यानंतर शहानिशा करुन आज दुपारी दीडच्या सुमारास एसीबीचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, उपअधीक्षक बी. व्ही. गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रेशमा सौदागर, पोलिस नाईक विजय बाम्हंदे, कल्याण सुरासे, रविंद्र आंबेकर आणि शिपाई अवील जाधव यांनी सापळा रचून पीडीत महिलेकडून पाच हजारांची लाच स्विकारताना जमादार गाडेला रंगेहाथ पकडले.

एसीबीकडे महिला तक्रारदारांचा ओघ तसा कमी आहे. महिला तक्रारदारांची शंभरातून एखादी तक्रार एसीबीकडे येते. ही तक्रारदार महिला आधीच पतीच्या त्रासाला कंटाळलेली होती. मात्र, पीडीतेकडेच गाडेने लाच मागितली. अशी माहिती पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.