हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनपासून जगभर पसरलेल्या कोरोनाव्हायरसने भारतातही आपल्या संसर्गाचा परिणाम वेगाने दाखवायला सुरवात केली आहे. आतापर्यंत देशातील २.२६ लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने एक दिलासा देणारी बातमी दिली आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, आम्ही भारताच्या कोरोनाच्या परिस्थितीतबाबत जे अंदाज बांधले होते त्यापेक्षा येथील परिस्थिती खूपच चांगली आहे. भारतात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ६,३४८ लोक मरण पावले आहेत.
भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून संक्रमित लोकांची संख्या ही ९ हजाराहून अधिक झालेली दिसून येत आहे. कोरोनाने संक्रमित होण्याच्या संख्येच्या बाबतीत भारताने आता इटलीला मागे टाकत जगातील सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने माहिती देताना असे म्हटले आहे की, हा विषाणू फार वेगाने भारतासह इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये पसरला नाही.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जागतिक आरोग्य संघटनेने अहवाल दिला आहे की, भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या दर तीन आठवड्यांनी दुपटीने वाढत आहे, परंतु आतापर्यंत भारत आणि दक्षिण आशियाई प्रदेशांमध्ये कोरोना विषाणूच्या वाढीचा परिणाम हा तितकासा दिसून आलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन पथकाचे प्रमुख डॉ. माईक रायन यांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण आशियातील भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे अतिशय दाट लोकवस्ती असूनही कोरोना विषाणूचा परिणाम अगदीच सौम्य झाला आहे. असे असले तरीही जोखीम मात्र अजूनही कायम आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणतात की भारतातील दोन लाखांहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली असली, तरी एक अब्ज तीस कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात ते प्रमाण फारसे नाही आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.