हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. सर्व धर्म, जाती, वंश, वेशभूषा, प्रदेश असा कोणताच भेद इथे केला जात नाही अशी महती सर्वत्र भारताची सांगितली जाते. अलीकडे काही घटनांमुळे भारताच्या महतीला गालबोट लागले असले तरी आजही अशा अनेक घटना पाहावयास मिळतात ज्यामुळे देशातील बंधुभावाचे दर्शन घडते. सोलापूर शहरात अशाच एका घटनेचा प्रत्यय आला. येथील मुस्लिम बांधवानी एका हिंदू महिलेवर विधिवत अंत्यसंस्कार करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे.
सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरात राहणाऱ्या कुलकर्णी कुटुंबातील पद्मावती कुलकर्णी या 80 वर्षीय महिलेचे कस्मात निधन झाले. यावेळी या कुटुंबात केवळ ३ लोक होते. त्यांनी ही घटना तेथील नगरसेवक तसेच रुग्णसेवेक म्हणून विशेष ओळख असणाऱ्या मौलाली बाशुमिया सय्यद उर्फ बाबा मिस्त्री यांना सांगितली. मिस्त्री यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. तेथील एकूण परिस्थिती पाहता घरी कुणीच नसल्याने त्यांनी महानगरपालिकेची गाडी मागवून मृतदेह स्मशानभूमीत नेला. आणि विधिवत अंत्यसंस्कार केले. कोरोनामुळे परिसरात भीतीचे वातावरण असल्याने इतर कुणी अंत्यसंस्कार करण्यास आले नाही मात्र मिस्त्री यांनी समभावाचे एक उदाहरण सर्वाना घालून दिले आहे.
कुलकर्णी यांचे नातेवाईक हे कर्नाटक येथे राहायला आहेत तर त्यांची 4 मुले आणि एक मुलगी ही पुणे,अहमदाबाद,संगमनेर,विजापूर आणि बंगलोर येथे वास्तव्यास आहेत. सद्यस्थितीत कोरोनामुळे ते येऊ शकले नाहीत. दरम्यान मिस्त्री यांनी आतापर्यंत कोरोनाबाधित ९५-९६ रुग्णांच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले असल्याची माहिती दिली आहे. आमच्या परिसरात कोणत्याच प्रकारचा भेदभाव पाळला जात नाही. आम्ही सर्व समानतेने राहतो असे मिस्त्री यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.