सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे|
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून गुरुवारी बाधितांचे द्विशतक पूर्ण झाले. शिराळा तालुक्यात हॉटस्पॉट बनलेल्या मणदूरमध्ये तब्बल सहा जण पॉझिटिव्ह आढळले. बाधितांमध्ये 90 वर्षीय वृद्ध महिलेसह सहा जणांचा समावेश आहे. त्यामध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. तालुक्यातील लादेवाडी मध्ये 41 वर्षीय पुरुष तर रिळेमध्ये 41 वर्षांची महिला, मिरज तालुक्यातील सोनीमध्ये 39 वर्षाचा तरुण, याशिवाय आटपाडीतील गळवेवाडी येथे 65 वर्षाचा वृद्ध बाधित असल्याचे स्पष्ट झाले. कोरोना बाधितांपैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 202 वर गेली असून सद्यस्थितीत 87 रुग्णांवर मिरजेतील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत.
शिराळा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. या भागातील बहुतांशी लोक मुंबईला नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने असतात. ते परतत असल्याने तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मात्र सर्वाधिक रुगण मणदूरमध्ये आढळत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. मणदूरमध्ये बाधितांच्या संपर्कातील पुन्हा सहा जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मणदूर येथील 80 वर्षीय व्यक्ती मुंबईतून आली होती. त्यानंतर बाधितांच्या संपर्कात आलेल्या मणदूर मधील व्यक्तींना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या संपर्कात आलेल्या तब्बल सहाजणांच्या स्वाबचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 17 वर्षाचा मुलगा, 23 वर्षांचा पुरुष, 90 वर्षांची वृद्ध महिला, 50 वर्षांचा पुरुष, 47 वर्षांची महिलासह 76 वर्षांच्या वृद्ध महिलेचा समावेश आहे. बाधित झालेले सर्वजण एकाच परिसरातील रहिवाशी आहेत. बाधित सर्वांना तातडीने मिरजेतील कोरोना रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल केले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
गेल्या पंधरा दिवसापासून शिराळा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या अधिकच वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रिळेमध्ये 41 वर्षाच्या महिलांमध्ये कोरोना ची लक्षणे आढळून आली होती त्यामुळे तिची प्राथमिक तपासणी केली कोरोनाची तीव्र लक्षणे असल्याने तिचा स्वॅब घेण्यात आला होता. त्या अहवालामध्ये बाधित असल्याचे स्पष्ट झाले. मांगले जवळील लादेवाडी येथे 41 वर्षीय पुरुषामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. त्याची तपासणी केली असता ती व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिरज तालुक्यातील सोनी मध्ये ठाण्यातून 39 वर्षांची व्यक्ती बुधवारी गावात आली होती. ती व्यक्ती आजारी होती. खोकल्याचा ज्यादा त्रास होता, त्यामुळे त्या व्यक्तीला तात्काळ मिरजेतील आयसोलेशन विभागात दाखल केले होते. तिथे कोरोनाची चाचणी घेतली असता त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी मध्ये 65 वर्षीय व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे होती. त्यामुळे त्याची प्राथमिक तपासणी तालुक्यात केली. त्या व्यक्तीला अधिक त्रास होऊ लागल्याने चाचणी घेतली. त्यामध्ये 65 वर्षीय वृद्ध बाधित असल्याचे स्पष्ट झाले.
चार जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात चौघे जण गुरुवारी कोरोनामुक्त झाले आहे. कडेगाव तालुक्यातील नेर्ली येथील 25 वर्षीय महिला, नेर्ली येथील 51 वर्षांची महिला, जत तालुक्यातील खलाटी येथील 62 वर्षांचा पुरुष, जत तालुक्यातील औंढी येथील 30 वर्षांच्या युवकाचा समावेश आहे.
जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 202
जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 202 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी सात व्यक्तींचा मृत्यू झाला असून 108 जण कोरोनामुक्त रुग्ण झाले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 87 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.