हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाच्या संक्रमणामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्य सरकारने राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात राज्यातील पोलीस दलात १० हजार जागांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, महसुल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, एसआरपीएफच्या अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी २ हजार जागा वाढवून एकूण १० हजार पोलीस शिपाई भरतीचे तसेच ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाच्या संकटकाळात ही भरती प्रक्रिया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल, याचा विचार करुन सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मंत्रिमंडळ मंजूरीनंतर भरती प्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
१० हजार पोलीस शिपायांची भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याचा निर्णयही आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला आहे. या बटालियनसाठी १३८४ पदे निर्माण करण्यात येणार असून, प्रत्येक टप्प्यात ४६१ प्रमाणे ३ टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलीस सेवेची संधी मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले आहे. राज्यातील सण, उत्सव, सामाजिक-राजकीय मोर्चांमध्ये महिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे. उपराजधानी नागपूरची भौगोलिक स्थिती, रेल्वे, विमान व दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता लक्षात घेवून एसआरपीएफच्या या केंद्रासाठी नागपूर जिल्ह्याची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगाने काटोल गावच्या हद्दीत शासकीय जमीन उपलब्ध असल्याने त्याठिकाणी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.