सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडे किंचितही दुर्लक्ष करून चालणार नाही – रोहित पवार 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या उत्पन्नातील तब्बल ४५% वाटा असणारे क्षेत्र म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचे क्षेत्र होय. संचारबंदीच्या आधीपासूनच नोटबंदी, जीएसटी यांच्या तातडीने केलेल्या अंमलबजावणीमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना खाजगी वित्तीय संस्था आणि बँकांकडून फारसे सहकार्य मिळत नाही आहे. त्यामुळे हे क्षेत्र संचारबंदीच्या आधीपासूनच अनेक समस्यांचा सामना करते आहे. हे क्षेत्र जवळपास ११ कोटी लोकांना रोजगार देणारे क्षेत्र आहे. येणाऱ्या काळातही देशाच्या अर्थकारणात या क्षेत्राचा वाटा महत्वाचा असणार आहे. त्यामुळे या क्षेत्राकडे किंचितही दुर्लक्ष करून चालणार नाही असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर तसेच फेसबुकच्या अकॉउंटवरून सांगितले आहे.

नोटबंदी, जीएसटी आणि आता संचारबंदी या स्थितीत या क्षेत्राची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे. केंद्र सरकारने जाहीरकेलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजवर या क्षेत्र आशा ठेवून होते. मात्र तिथेही निराशा झाली आहे. आर्थिक पॅकेजच्या आवरणात केंद्र सरकारने कर्जाधारित पॅकेज जाहीर केले. या सर्व समस्यांमुळे या क्षेत्रातील कोणताही घटक समाधानी नाही आहे. या संचारबंदीनंतर पुन्हा उद्योग सुरु केले तरी त्यांना त्यांचे नुकसान भरून काढता येणार नाही आहे. असे सांगत या क्षेत्रातील सुमारे ८५% उद्योगांची अवस्था अतिगंभीर असून स्टार्टअप चा जो गाजावाजा सरकारने केला आहे त्यातील ७४% स्टार्टअप पुढच्या काही महिन्यात बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी यात नमूद केले आहे.

 

या उद्योगांकडे खेळत्या भांडवलाची वाणवा आहे. त्यांना सरकारकडूनही बरीच येणी आहेत मात्र ती वेळेवर येतील याची शाशवती नाही. एकूणच कोट्यवधी लोकांना रोजगार देणाऱ्या या क्षेत्राला वाचविण्यासाठी आता प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे पवार यांनी म्हंटले आहे. म्हणून सरकारने या क्षेत्राची देणी लवकर देणे, त्यांना खेळते भांडवल  पुरविणे,तारण न ठेवता कर्ज देणे सोबतच व्याजाचे दर कमी करणे अशा गोष्टी करणे गरजेचे आहे असे रोहित पवार यांनी सुचविले आहे. या क्षेत्राला लवकरात लवकर सावरण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.