सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे |
सांगली जिल्ह्यतल्या मिरज तालुक्यातील तुंग जवळील विठलाईनगर येथील चांदोली वसाहतीमधील सात वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून निघृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. चिमुरडी बुधवारी सायंकाळी दुकानात खायला आणायला म्हणून बाहेर पडली होती. रात्रीपासून सर्वत्र तिचा शोध सुरू होता. आज सकाळी ऊसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख श्रीकांत पिंगळे, पोलिस निरीक्षक उमेश दंडिले, पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी पथकासह धाव घेतली. श्वान पथकाला आणि फॉरेन्सिक लॅबमधील पथकाला पाचारण केले. एका सात वर्षीय चिमुरडीचा खून झाल्याच्या घटनेने तुंग गाव हादरून गेले आहे.
तुंग गावापासून एक किलोमीटर अंतरावर विठलाईनगर ही चांदोली धरणग्रस्तांची वसाहत आहे. या वसाहतीतील पहिलीत शिकणारी सात वर्षाची चिमुरडी बुधवारी सायंकाळी दुकानातून खायला आणायला जातो म्हणून घराबाहेर पडली. त्यानंतर रात्री उशिर झाला तरी घरी परतली नाही. त्यामुळे आई-वाडीलांसह परिसरातील ग्रामस्थ तिचा शोध घेऊ लागले. रात्री आठच्या सुमारास वसाहतीमध्ये तिचा शोध सुरू झाला. परिसरातील नागरिक देखील शोधकार्यात गुंतले. जवळच्या शेतात देखील शोध घेतला. तरी देखील ती कोठे सापडली नाही. उशिरा शोधकार्य थांबवले.
आज सकाळी पुन्हा चिमुरडीचा शोध सुरू केला. तेव्हा गावातील वासू पाटील यांच्या ऊसाच्या शेतात तिचा मृतदेह दिसला. ग्रामस्थांनी याची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली. ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश दंडिले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकासह फॉरेन्सिक लॅबमधील पथकाला पाचारण केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक देखील तातडीने घटनास्थळी आले. ऊसाच्या शेतात चिमुरडीचा मृतदेह पडला होता. प्राथमिक तपासात तिचा लेगिन्सने गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच डोक्यात एक छोटीसी जखम आहे. श्वान पथकाच्या मदतीने मारेकऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा डुबुले, पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक दंडीले, सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे हे ही घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान धरणग्रस्तांच्या वसाहतीतील चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याची माहिती पसरताच नागरिक घटनास्थळी धावले. पोलिसांनी गर्दी हटवून तपासकार्य सुरू केले. प्राथमिक तपासात गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले असले तरी लैंगिक अत्याचार केल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पहिलीत शिकणाऱ्या एका सात वर्षीय चिमुरडीच्या खुनाच्या घटनेनं गावात मात्र खळबळ उडाली
आहे. आपल्या सात वर्षीय मुलीच्या खुनाची घटना उघडकीस येताच कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.