सोलापूर जिल्ह्यात मतदान संथगतीने; दुपारपर्यंत केवळ ३३.१२ टक्के मतदान

विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत ३३.१२ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली.

‘शंभरी’ पार केलेल्या आजीने बजावला तिसऱ्या पिढी सोबत मतदानाचा हक्क

नाशिकच्या गवळाने गावात राहणाऱ्या १०२ वर्षांच्या सखुबाई नामदेव चुंबळे मात्र प्रत्येक निवडणुकीत आपल्या संपूर्ण परिवाराला घेऊन जात मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी आपल्या तीन पिढ्यांना बरोबर नेत आज देखील मतदान केलं. आणि तरुणांसमोर एक आदर्श निर्माण करणाऱ्या करून दिला.

मतदारांनो ‘या’ मुलीचा आदर्श घ्या…!

विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. सुट्टी असल्याने अनेक जण मतदान करण्याऐवजी घरीच आराम करण्याचा किंवा बाहेर फिरायला जाण्याच बेत आखतात. मात्र मतदान आपलं कर्तव्य आहे, याचा अनेकांना विसर पडतो. मात्र समाजात अशीही काही मंडळी आहेत, ज्यांना कठीण परिस्थितीतही आपल्या कर्तव्याची जाणीव आहे. दिंडोरी विधानसभा निवडणुकीत पेठ शहरातील खातून मुस्ताक शेख ही दोन्हीही पायानं अपंग आहे. तरीही या मुलीनं आज मतदानाचा आपला हक्क बजावला.

रवी राणांनी सपत्नीक बजावला मतदानाचा अधिकार

अमरावती जिल्ह्यात मतदानाचा जोर चांगलाच दिसून येत आहे. अपक्ष राहूनही आपण निवडून येऊ शकतो असा दांडगा आत्मविश्वास सोबत असलेल्या राणा परिवाराने आज मतदानाचा अधिकार बजावला. विद्यमान आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत कौर राणा यांनी आज सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावली.

मुंढव्यात बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस

आज संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. अनेक ठिकाणी शांतपणे आणि शिस्तीत मतदान सुरू असताना काही ठिकाणी मात्र मतदानाला हिंसक स्वरूप आणि बोगसपणाचं गालबोट लागल्याचं निदर्शनास आलं आहे. करमाळा येथे दोन अपक्ष उमेदवारांच्या गटामध्ये धुमश्चक्री झाल्यानंतर पुण्यातील मुंढवा परिसरात बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदान स्लिपवर नाव आणि नंबर असतानाही, कुठल्याच ओळ्खपत्राची तपासणी न करता दुसरी महिला मतदान करून गेल्यामुळे मतदानाचा हक्क न बजावता येणाऱ्या महिलेने आपली खंत माध्यमांसमोर व्यक्त केली आहे.

‘मतदान करा आणि मिळवा मिसळवर १० % डिस्काउंट’

”खणखणीत मत देऊन आलोय.. झणझणीत मिसळ खायला” हे घोषवाक्य आहे कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या लक्ष्मी मिसळ यांचं. मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी चक्क मतदान करून आल्यानंतर मिसळ वरती १०% डिस्काउंट दिला या ‘लक्ष्मी मिसळ’ यांनी दिला आहे. यावेळी ‘मतदान केलेलं बोट दाखवा आणि १०% डिस्काउंट मिळवा’ अशी खास ऑफर त्यांनी मतदारांना ठेवली आहे.

पालघर जिल्ह्यात सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात

पालघर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात आज सकाळी 7 वाजल्या पासून मतदानाला सुरवात झाली आहे. जिल्यात एकूण एकूण-19 लाख 51 हजार 668 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यातील नालासोपारा विधान सभेत 2 लाख 86 हजार 4 पुरुष, तर 2 लाख 33 हजार 20 स्त्रिया आणि  इतर- 58 असे  एकूण-5 लाख 19 हजार 82 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मतदान करणाऱ्यांना सरकारकडून सर्वात जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार – मुख्यमंत्री फडणवीस

मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे’ नागरिकांना आवाहन केले. तसेच ‘प्रत्येकाला सरकारकडून अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे.’ मतदान करणाऱ्यांना सर्वात जास्त अधिकार आहे. सर्वांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करावं’ असे आवाहन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे

भंडाऱ्यात मतदानाला सुरवात, १० लाख मतदार बजावणार हक्क

आज राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान होत असून, सकाळी सात वाजल्यापासून राज्यात सर्वत्रच मतदानाला सुरवात झाली आहे. भंडारा जिल्हातील तीन मतदार संघात १ हजार २०६ मतदार केंद्र आहेत. तर या मतदार संघात एकूण ९ लाख ९१ हजार ८९० मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. नागरिकांना मतदान व्यवस्थित करता यावे तसेच कुठल्याही अडचणी येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने ५ हजार २०२ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २ हजार ३७५ पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ‘ईव्हीएम’मध्ये नोंद होणार

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.