गडचिरोली प्रतिनिधी । महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर हा नक्षलवादी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात अनेकदा नक्षली कारवाया होत असतात. त्यामुळे या परिसरात नेहमीच पोलीस दक्ष असतात. आज चंद्रपूर उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र हद्दीत नक्षलवादी आणि सी-६० कमांडोंच्या मध्ये चकमक झाली. यामध्ये एका नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे.
आज (शुक्रवारी) संध्याकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. गस्तीवर असलेल्या सी-६० जवानांच्या पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. मात्र नक्षलवाद्यांचा डाव उधळून लावत प्रत्युत्तरादाखल कमांडोंनीही नक्षलवाद्यांवर हल्ला चढवला. सुमारे अर्धा तास चाललेल्या या धुमश्चक्रीत एक नक्षलवादी ठार झाला आहे.
सी-६० कमांडोंचा दबाव वाढत असल्याचं पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलात पळ काढला. जंगल परिसराची पाहणी केली असता कमांडोंना एका नक्षल्याचा मृतदेह, १ हत्यार, २० पिट्टू आणि मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य सापडलं. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्याची ओळख पटवणं बाकी असून आजच्या घटनेनंतर सी-६० कमांडोंनी परिसरातली गस्त अधिक वाढवली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.